वाशिम: जिल्ह्यात महाबीजचे ३०५  बीजोत्पादक काळ्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 12:13 PM2021-06-16T12:13:26+5:302021-06-16T12:13:32+5:30

Mahabeej News : शहानिशा करून महाबीजच्या व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकले आहे.  

Washim: 305 seed growers of Mahabeej in the district are blacklisted | वाशिम: जिल्ह्यात महाबीजचे ३०५  बीजोत्पादक काळ्या यादीत

वाशिम: जिल्ह्यात महाबीजचे ३०५  बीजोत्पादक काळ्या यादीत

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात महाबीजसाठी खरीप हंगामात बीजोत्पादन करणाऱ्या ३०५ शेतकऱ्यांना महाबीज व्यवस्थापनाने काळ्या यादीत टाकले आहे. या शेतकऱ्यांनी गतवर्षी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग घेऊनही सोयाबीनचे उत्पादन झाल्यानंतर  ते उगवण क्षमता चाचणीत पास होऊनही महाबीजला न देता खासगी बाजारात विक्री केली होती. त्याची शहानिशा करून महाबीजच्या व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकले आहे.  
वाशिम जिल्ह्यात गतवर्षी १० हजार ३५७ हेक्टर क्षेत्रावर महाबीजकडून बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात ३ हजार ४६६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यात सोयाबीनचे प्रमाण सर्वाधिक होते. जवळपास साडे सात हजार हेक्टरवर केवळ सोयाबीनचा बिजोत्पादन कार्यक्रम महाबीजकडून राबविला गेला. या कार्यक्रमांतर्गत उत्पादित शेतमालाची महाबीजकडून खरेदी केली जाते. ही खरेदी करताना शासनाचे हमीभाव किंवा बाजार समित्यांत जानेवारी आणि डिसेंबर महिन्यात असलेले सर्वाधिक दर गृहीत धरले जातात. शिवाय त्यात २० टक्के आगाऊ रक्कमही शेतकºयांना बोनस म्हणून दिली जाते. गतवर्षी बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीसाठी महाबीजने नमुने संकलित केले आणि त्याची उगवण क्षमता प्रयोगशाळेत तपासून घेतली. या प्रक्रियेअंतर्गत बियाणे पास झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ३०५ शेतकऱ्यांनी महाबीजला बियाणे न देता ते खासगी बाजारात विकले. त्यामुळे महाबीजच्या व्यवस्थापनाने त्यांना नियमानुसार काळ्या यादीत टाकले. आता या शेतकऱ्यांना महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.


महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेले बियाणे उगवण क्षमता चाचणीत पास झाल्यानंतर करारानुसार महाबीजला देणे आवश्यक आहे. यंदा काही शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणीत पास होऊनही महाबीजला न देता खासगी बाजारात विकले. ही बाब निराशाजनक आहे. यामुळे महाबीजच्या बीजोत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
- डॉ. प्रशांत घावडे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वाशिम 

Web Title: Washim: 305 seed growers of Mahabeej in the district are blacklisted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.