वाशिम : ३.६९ लाख लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ ची प्रतिक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:13 PM2019-09-23T18:13:28+5:302019-09-23T18:13:47+5:30
आतापर्यंत ४.५९ लाखांपैकी ९० हजार लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले आहे. सिल्वर कार्ड १०२०७१ लाभार्थींना सिल्वर कार्डचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९० हजार लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ वाटप केले असून, उर्वरीत तीन लाख ६९ हजार लाभार्थींना सदर कार्डची प्रतिक्षा आहे.
पात्र लाभार्थींना आरोग्यविषयक सुविधांचा लाभ देण्यासाठी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंमलात आली आहे. राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना सुद्धा आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५५३ कुटुंबातील ४ लाख ५९ हजार ६४१ लाभार्थी हे गोल्डन कार्डसाठी पात्र ठरले आहेत. सदर कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर यासह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासह वाशिम येथील चार खासगी हॉस्पिटल येथील आरोग्य मित्रांकडे नोंदणी करावी लागत आहे. आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्राम पंचायतीमध्ये नियुक्त डाटा एन्ट्री आॅपरेटर व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर येथून कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी प्रती व्यक्ती ३० रुपये शुल्क आकारणी तर अंगीकृत रुग्णालयामध्ये याकरिता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आतापर्यंत ४.५९ लाखांपैकी ९० हजार लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले आहे. सिल्वर कार्ड १०२०७१ लाभार्थींना सिल्वर कार्डचे वाटप करण्यात आले.