वाशिम : २२४ जि. प.शाळांच्या ४०९ शिकस्त वर्गखोल्या पाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 02:24 PM2020-02-22T14:24:56+5:302020-02-22T14:25:24+5:30
काही वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असून अपघाताची घटना नाकारता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या २२४ शाळांच्या ४०९ वर्गखोल्या शिकस्त असल्याने संभाव्य अपघाताची घटना टाळण्यासाठी सदर वर्गखोल्या पाडण्याची तयारी शिक्षण विभागाने चालविली आहे. निर्लेखित वर्गखोल्यांचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे येत्या आठवडाभरात पाठविला जाणार आहे. या वृत्ताला शिक्षण विभागाने २१ फेब्रुवारी रोजी दुजोरा दिला.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण ७७९ शाळा असून येथे शिक्षण दिले जाते. काही शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या नाहीत तसेच काही शाळांच्या वर्गखोल्या शिकस्त झालेल्या आहेत. शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्हयातील २२४ शाळेच्या ४०९ वर्गखोल्या शिकस्त आहेत. यामधील काही वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असून अपघाताची घटना नाकारता येत नाही. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय वर्गखोली पाडता येत नसल्याने शिक्षण विभागाने या निर्लेखित वर्गखोल्यांची प्रशासकीय प्रक्रिया हाती घेतली आहे.
जिल्हा परिषदेत राकाँ, काँग्रेस व सेना ही महाविकास आघाडी व भारिप-बमसंची सत्ता स्थापन झाल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी पहिली सर्वसाधारण सभा झाली. या सभेत निर्लेखित (वर्गखोल्या पाडणे) ४०९ वर्गखोल्यांचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून, येत्या आठवडाभरात हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविला जाणार आहे. अधीक्षक अभियंत्यांच्या चमूने ‘स्ट्रक्चरल आॅडीट’ केल्यानंतर नेमक्या किती वर्गखोल्या पाडावयाच्या याची निश्चिती होणार आहे. विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शिकस्त वर्गखोल्या पाडण्याची प्रशासकीय कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.
बांधकामासाठी १५७ शाळांना निधीच मिळेना
एकूण १५७ वर्गखोल्यांची नितांत आवश्यकता असून, या वर्गखोल्यांसाठी निधी मिळावा, याकरीता शिक्षण विभागाकडून एका वर्षापूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजूरी मिळालेली नाही.
सन २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपायला केवळ सव्वा महिला शिल्लक आहे. या सव्वा महिन्यात राज्य शासनाकडून निधी मिळाल्यास १५७ वर्गखोल्यांच्या बांधकामाचा प्रश्न निकाली निघेल.
जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्यात येईल. १५७ वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
- चक्रधर गोटे, सभापती, शिक्षण व आरोग्य, जिल्हा परिषद वाशिम
२२४ शाळांच्या ४०९ वर्गखोल्या शिकस्त असल्याने त्या पाडण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडला होता. हा ठराव मंजूर झाल्याने, पुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
-अंबादास मानकर,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद वाशिम