वाशिम : ६३ उमेदवारांनी दाखल केले ९२ उमेदवारी अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:04 PM2019-10-05T14:04:21+5:302019-10-05T14:06:04+5:30
७ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने, अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीतील लढतीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ४ आॅक्टोबर या अंतिम मुदतीपर्यंत ६३ उमेदवारांनी ९२ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल केले आहेत. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात २६ उमेदवारांनी ३८ अर्ज, वाशिममध्ये १७ उमेदवारांनी २१ अर्ज आणि कारंजा मतदारसंघात २० उमेदवारांच्या ३३ अर्जांचा समावेश आहे. दरम्यान, ७ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने, अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीतील लढतीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी रिसोड मतदारसंघातून २० उमेदवारांनी ३० अर्ज सादर केले असून आतापर्यंत २६ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केले आहेत. कारंजा मतदारसंघात १२ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत २० उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले. ४ आॅक्टोबरला वाशिम मतदारसंघातून १४ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले असून आतापर्यंत १७ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले.
शुक्रवारी रिसोड मतदारसंघातून आमदार अमित झनक (काँंग्रेस), विश्वनाथ सानप (शिवसेना), माजी खासदार अनंतराव देशमुख (अपक्ष), माजी आमदार विजयराव जाधव (अपक्ष), दत्तराव धांडे (एमआयएम), विजयकुमार उलामाले (मनसे), शे. ख्वाजा शे. फरीद (बसपा), बबनराव मोरे (किसान समाज पार्टी) या प्रमुख पक्षासह आदींनी अर्ज सादर केले.
वाशिम मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे (वंचित बहुजन आघाडी), रजनी राठोड (काँग्रेस), नीलेश पेंढारकर (अपक्ष), दिलीप भोजराज (बसपा), संतोष बन्सी कोडीमंगल (प्रहार जनशक्ती) यासह १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
कारंजा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार प्रकाश डहाके (राकाँ), डॉ राम चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), डॉ. सुभाष राठोड (मनसे), मनिष मोडक (प्रहार जनशक्ती), गजानन अमदाबादकर (अपक्ष) यांच्यासह २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ आॅक्टोबर असून, त्यानंतर निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. बंडखोरी होऊ नये म्हणून नाराजांची मनधरणी सुरू आहे.
(प्रतिनिधी)