वाशिम : २३ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 05:38 PM2020-02-28T17:38:37+5:302020-02-28T17:41:17+5:30
८६ परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांचा वॉच : प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक ...
८६ परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांचा वॉच : प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाºया माध्यमिक शालांत अर्थात दहावीच्या वार्षिक परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. एकूण २३,२७१ विद्यार्थी हे ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार असून, गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत.
दहावीची वार्षिक परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख तसेच मुख्याध्यापकांच्या बैठका घेण्यात आल्या. जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवरील कॉपी प्रकरणे लक्षात घेता जिल्हा प्रशासन तसेच शिक्षण विभागाकडून एकूण १२ भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या. जिल्ह्यात दहावीच्या वार्षिक परीक्षेला एकूण २३ हजार २७१ विद्यार्थी बसणार असून, यामध्ये नियमित २०९२२ तर रिपिटर २३४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिक्षेत्रात परीक्षा कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश
गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी इयत्ता दहावी परीक्षा होणाºया सर्व परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिक्षेत्रात परीक्षा कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहेत. परीक्षा केंद्रांवर ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडून नियुक्त केलेले अधिकारी वगळता इतर इसमांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
दहावीच्या परीक्षेला ३ मार्चपासून सुरूवात होणार आहे. एकूण ८६ परीक्षा केंद्र असून, १२ भरारी पथके राहणार आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनीदेखील परीक्षा केंद्र संचालकांना सहकार्य करावे. विद्यार्थ्यांनीदेखील परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार, कॉपी आढळून आल्यास संबंधित परीक्षार्थीविरूद्ध कारवाई केली जाईल.
- तानाजी नरळे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद वाशिम