वाशिम: पाण्याअभावी ९00 एकरावरील ‘सेंद्रिय शेती’चा प्रयोग वांध्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:36 AM2017-12-26T02:36:01+5:302017-12-26T02:36:57+5:30
वाशिम: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत (आत्मा) जिल्ह्यातील १८ शेतकरी गटांच्या माध्यमातून तब्बल ९00 एकर शेतीक्षेत्रावर आगामी तीन वर्षाकरिता सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते; मात्र योजनेच्या दुसर्याच वर्षी सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने ‘सेंद्रिय शेती’चा हा प्रयोग वांध्यात सापडला असून, सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येणार्या भाजीपाल्यालाही बाजारपेठेत अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

केंद्रशासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत २0१६-१७ च्या खरीप हंगामापासून वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव या सहा तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५0 शेतकर्यांचे ३ याप्रमाणे १८ गट स्थापन करण्यात आले. गटनिहाय निवड करण्यात आलेल्या शेतकर्यांना सेंद्रिय पद्धतीने अन्नधान्य, फळे, भाजीपाला पिकविण्यासाठी प्रोत्साहित करण्यासोबतच त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षणही देण्यात आले. या माध्यमातून तब्बल ९00 एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती फुलायला लागली होती; मात्र रासायनिक पद्धतीने कसल्या जाणार्या शेतीच्या तुलनेत अगदीच भिन्न आणि वेळखाऊ प्रक्रिया असलेल्या सेंद्रिय शेतीला काही गावांमधील शेतकर्यांचा अपवाद वगळल्यास विविध स्वरूपातील अडचणींमुळे अद्याप अपेक्षित चालना मिळालेली नाही. अशातच यंदाच्या पावसाळ्यात घटलेल्या पर्जन्यमानामुळे ग्रामीण भागातील सिंचन प्रकल्प, हातपंप, कूपनलिका, विहिरींनी हिवाळ्यातच तळ गाठल्यामुळे सिंचनाचा प्रश्न भेडसावत असल्याने अभियानात सहभागी शेतकर्यांनी सेंद्रिय पद्धतीने मालाचे उत्पादन घेणे बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या शेतकर्यांना सेंद्रिय खत कसे तयार करायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय शेतातच निंबोळी अर्क तयार करणे, दशपर्णी, जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक ‘आत्मा’च्या माध्यमातून देण्यात आले. त्याचा अपेक्षित फायदा होत शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले होते. चालूवर्षीच्या रब्बी हंगामातही काही शेतकर्यांनी सेंद्रिय पद्धतीने तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. सध्या मात्र पाण्याची मोठय़ा प्रमाणात टंचाई भासत असल्याने सेंद्रिय शेती धोक्यात सापडली आहे.
- डॉ. डी.एल. जाधव
प्रकल्प संचालक, ‘आत्मा’