वाशिम जिल्हयातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागरिक अद्याप परजिल्ह्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 11:10 AM2020-04-05T11:10:59+5:302020-04-05T11:11:08+5:30
वाशिम जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागिरक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातच अडकून पडल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली.
- दादाराव गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नुक केंद्र्रशासनाच्या लॉकडाऊनसह राज्याच्या सीमाबंदी आदेशानंतर वाशिम जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागिरक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातच अडकून पडल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली. संबंधित जिल्हाप्रशासनाकडून त्यांची सोय करण्यात आली असली तरी, ही सर्व मंडळी आपल्या गावी परतण्यासाठी धडपड करीत आहेत.
राज्यशासनाच्या सीमाबंदी आदेशानंतर सर्वच जिल्हाप्रशासनाने परजिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातील लाखो लोक विविध जिल्ह्यात अडकून पडले आहेत. अशात सोयीसुविधा नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. ही मंडळी आपापल्या जिल्ह्यात परतण्यासाठी गैरमार्गाचा अललंब करीत आहे. त्यात मालवाहू वाहनांतून प्रवास करण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून होत आहे. या प्रकारातून अपघातही घडले आहेत. शिवाय कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अशा लोकांना सुविधा पुरविण्यासाठी राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांना या लोकांची माहिती संकलित करून त्यांच्या भोजन, निवासाची सोय करण्याचे आदेश दिले, तर सर्व जिल्हा प्रशासनाला त्यांच्या जिल्ह्यातील परजिल्ह्यात असलेल्या लोकांची माहितीही घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाशिम जिल्हाप्रशासनाने घेतलेल्या माहितीत जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ लोक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात अडकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, परजिल्ह्यात अडकलेले वाशिम जिल्ह्यातील काही कामगार वाहनांची सोय नसल्याने शेकडो किलोमीटर अंतराचा प्रवास पायी करून गाव गाठण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध मार्गावर दिसत आहे. अशा कामगारांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नवी नुंबई, पुण्यात सर्वाधिक लोक
वाशिम जिल्हाप्रशासनाकडून परजिल्ह्यातच अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यात आल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक १७४ कुटुंबातील ४७७ नागरिक पुणे येथे, तर ११७ कुटूंबातील १२५ नागरिक नवी मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याशिवाय मुंबई येथे ११ कुटुंबातील ७२, कोल्हापूर येथे ३ कुटुंबातील ६६, पालघर येथे १९ कुटुंबातील ५९, ठाणे येथे ७ कुटुंबातील ४२, वर्धा येथे ६ कुटुंबातील ४०, अहमदनगर येथे ७ कुटुंबातील २२, हिंगोली येथे २ कुटुंबातील १७ आणि रत्नागिरी येथे अडकलेल्या १ कुटुंबातील १३ लोकांचा यात प्रमुख समावेश आहेत.
आधार नसलेल्यांची निवाऱ्यात सोय
परजिल्ह्यात अडकलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यशासनाने त्यांच्यासाठी खाण्यापिण्यासह निवाºयाची व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यात कुठलाही आधार नसलेले कामगार वा इतर लोकांना शासकीय ईमारतींत राहण्याची व्यवस्था सर्व संबंधित जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली असून, याच ठिकाणी त्यांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आलेली आहे.