Washim: घरकुल, विहिरीसाठी सोडली लाज; सरपंचासह पतीने स्वीकारली लाच,माहुली येथील घटना
By संतोष वानखडे | Published: November 16, 2023 03:49 PM2023-11-16T15:49:28+5:302023-11-16T15:50:15+5:30
Bribe Case: घरकुल व विहिरीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी माहुली (ता.मानोरा) येथील सरपंच पतीने १३ हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले.
- संतोष वानखडे
वाशिम - घरकुल व विहिरीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी माहुली (ता.मानोरा) येथील सरपंच पतीने १३ हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले. सरपंच गौकर्नाबाई विष्णू राठोड (५०) व विष्णू मंगु राठोड (५५) दोन्ही रा. माहुली, अशी आरोपींची नावे आहेत.
घरकुल व विहिरींसाठी काही सरपंच, त्यांचे नातेवाईक पैशाची मागणी करतात, अशा अनेकांच्या तक्रारी असतात. कोणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करतो तर कोणी मुकाट्याने पैशाची मागणी पूर्ण करतो. माहुली येथील तक्रारदाराचे एक घरकुल व त्यांच्या नातेवाईकांचे घरकुलाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी ४ हजार रुपये तसेच तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या दोन विहिरीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी सरपंच गौकर्णाबाई राठोड व विष्णू मंगू राठोड यांनी केली होती.
यासंदर्भात प्राप्त तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ९ नोव्हेंबर रोजी पडताळणी कार्यवाही केली असता, आरोपींनी तडजोडीअंती १३ हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी सापळा कार्यवाही केली असता, विष्णू राठोड याने १३ हजार रुपये लाच रक्कम स्विकारली. आरोपींविरूद्ध मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड व सुजित कांबळे, एएसआय दुर्गादास जाधव, कर्मचारी असिफ शेख, राहुल व्यवहारे, संदिप इढोळे, समाधान मोघाड, चालक मिलींद चन्नकेसला आदींनी पार पाडली.