वाशिम : चंद्राच्या लख्ख प्रकाशात दिसला लांडगा, हरिण अन् बिबटही!
By सुनील काकडे | Published: May 24, 2024 03:45 PM2024-05-24T15:45:23+5:302024-05-24T15:45:43+5:30
वैशाख पाैर्णिमेला काटेपूर्णा अभयारण्यात झाली प्राणी गणना
वाशिम : वाशिम आणि अकोला या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील ६५०० हेक्टरवर वसलेल्या घनदाट काटेपूर्णा अभयारण्यात वैशाख पाैर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात वन्यजीव व प्राणी गणना पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या वन्यप्रेमी व पर्यटकांनी पानवठ्यांलगत उभारण्यात आलेल्या १० मचानांवर रात्रभर जागून वन्यप्राण्यांच्या हालचालींची नोंद घेतली. यादरम्यान लांडगा, हरिण अन् बिबटही दृष्टीस पडल्याने वन्यप्रेमींचा उत्साह द्विगुणित झाला.
वैशाख पाैर्णिमेच्या रात्री चंद्राचा लख्ख प्रकाश धरतीला प्रकाशमान करतो. त्यामुळे दरवर्षी काटेपूर्णा अभयारण्यातील वन्यप्राण्यांचे दर्शन आणि त्यांची हालचाल नोंदवून घेण्याकरिता ही रात्र वन्यप्रेमींसाठी खुली करून दिली जात असते. जैवविविधता आणि वनसंपदेने नटलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात बिबट, अस्वल, चौसिंगा, काळवीट, नीलगाय, चितळ, रानडुक्कर, सायाळ, खोपळ, रानकुत्रे, सांबर, हरियाल, नौरंग, सर्पगरुड, सातभाई, रातवा, खंड्या, चंडोल, घार, तुरेवाला सर्पगरुड, टकाचोर, तांबट आदी पशूपक्ष्यांच्या प्रजाती पाहावयास मिळतात.
दरम्यान, २३ मे रोजी दुपारी २ वाजतापासूनच काटेपूर्णा अभयारण्यातील १० कृत्रीम पाणवठ्यांलगत उभारलेल्या मचानांवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या वन्यप्रेमींनी चढाई करून वन्यजीवांची प्रतीक्षा करणे सुरू केले. यादरम्यान हरिण, काळवीट, लांडगा, नीलगाय, रानडुक्कर या प्राण्यांसह अनेक पक्ष्यांचेही जवळून दर्शन घेण्याची संधी वन्यप्रेमींना प्राप्त झाली.
चंद्राच्या लख्ख प्रकाशात मचानावर बसून प्राण्यांच्या हालचाली टिपताना स्वर्गीय आनंदाची अनुभती झाली. रात्रीच्या निरव शांततेत पशूपक्ष्यांचे आवाज ऐकताना विलक्षण आनंद मिळाला.
मयुरेश वाठारकर,
निसर्गप्रेमी, पुणे
प्राणी गणना उपक्रमाच्या माध्यमातून पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्याला जवळून अनुभवता आले. विविध प्राण्यांचे व पक्ष्यांचे आवाजही ऐकावयास मिळाल्याने निसर्ग व्यासंगाचा परिपूर्ण आनंद लुटता आला.
राम धनगर,
निसर्गप्रेमी, वाशिम
६५०० हेक्टरवर वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात विविध प्रजातींचे प्राणी व पक्ष्यांचा वावर आहे. वैशाख पाैर्णिमेच्या रात्री मचानांवरून त्यांच्या हालचाली टिपताना वेगळ्या आनंदाची अनुभूती मिळाली.
गणेश देशमुख,
निसर्गप्रेमी, बुलढाणा
वैशाख पाैर्णिमेच्या रात्री चंद्राचा लख्ख प्रकाश असतो. ती संधी साधत वन्यप्राण्यांची हालचाल टिपता यावी, यासाठी कृत्रीम पाणवठे आणि १० मचान उभारण्यात आले होते. भविष्यात मचानांची संख्या वाढविण्याचा विचार आहे.
पवन जाधव,
वनपरिक्षेत्र अधिकारी काटेपूर्णा अभयारण्य