वाशिम : आदेशानंतरही ‘आधार’ची कामे बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:04 AM2020-06-03T11:04:35+5:302020-06-03T11:04:49+5:30
आदेशही २० दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले; परंतु अद्याप ही कामे सुरू झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्तीसह अद्ययावतीकरणाचे काम करणाऱ्या महाआॅनलाईन कंपनीचे कामकाज शासनाने थांबवत ही जबाबदारी ‘महाआयटी’ या कंपनीकडे दिली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात ही कामे सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसे आदेशही २० दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले; परंतु अद्याप ही कामे सुरू झाली नाही. त्यात महाआॅनलाईन कंपनीकडून जमा करून घेतलेल्या काही आधार किट नादुरुस्त असल्याने ‘आधार’ची कामे कधी सुरू होतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या १८ मार्च २०२० च्या आदेशानुसार जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र (सेतू केंद्र) बंद ठेवण्यात आले होते. आता नागरिकांना आपले विविध शासकीय, तसेच इतर महत्त्वाचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आधार नोंदणी व आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाºयांनी १७ मे रोजी या संदर्भात आदेश पारित करून आधार नोंदणी सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. विशेषत: ग्रामीण भागांतील नागरिकांना यासाठी शहरात येण्याची गरज भासू नये म्हणून प्रामुख्याने ग्रामीण भागांतीलच केंद्र सुरू करण्याचेही या आदेशाद्वारे सुचविण्यात आले होते.
तथापि, आता दोन महिने उलटून गेले आणि जिल्हाधिकाºयांनी आदेश दिले असले तरी, ही कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. या कामाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या महाआयटी कंपनीने महाआॅनलाईनकडून जिल्हा प्रशासनाने जमा करून घेतलेल्या आधार किट अद्याप केंद्र संचालकांना वितरीत करण्यासाठी हस्तांतरीत करून घेतलेल्या नसून, त्यातील बहुतांश मशीन नादुरुस्त असल्याची माहितीही मिळाली आहे. या सर्व कारणांमुळे आधार नोंदणी आणि आधार दुरुस्तीअभावी कामे प्रलंबित असलेल्या नागरिकांची मोठी ससे होलपट सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, या प्रक्रियेत असलेन्या सर्व अडचणी दूर करून जिल्ह्यात तातडीने आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे प्रशासनाने सुरु करण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी आधार नोंदणीची प्रतिक्षा करणारे जिल्हाभरातील हजारो नागरिक करीत आहेत.
‘महाआयटी’च्या परिक्षेचीही अडचण
जिल्हाधिकाºयांनी १७ मे रोजी मंगरुळपीर तालुक्यातील कन्टेंनमेंट झोनमधील कवठळ वगळता इतर ग्रामीण भागांत आधार नोंदणीच कामे करण्याचे, तर २२ मे रोजी शहरी भागांतही आधार नोंदणीची कामे सुरू करण्याचे आदेश पारित करूनही ३१ मे पर्यंतही आधार नोंदणीचे काम जिल्ह्यात सुरू न झाले नाही. दरम्यान, आधार नोंदणीचे काम करणाºयांना आधार किट देण्यापूर्वी महाआयटीकडून त्यांची परिक्षा घेण्यात येते. ही परिक्षा दिल्यानंतर संबंधिताकडून ५० हजार रुपये अनामत रकमेच्या आधारे आधार किट दिली जाते; परंतु गत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे ही परिक्षा घेणेही शक्य नाही. त्यामुळेही काही ठिकाणी आधार नोंदणी सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे दिसत आहे.
जिल्हाधिकाºयांनी १७ मे रोजी कवठळ हे कन्टेनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणी ग्रामीण भागांत, तसेच २२ मे रोजी शहरी भागांतही आधार नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आधार नोंदणी सुरू करण्यात कोणत्याच अडचणी यायला नको.आधार किटच्या उपलब्धतेचा विचार करता पूर्वी काही संचालकांना आधार नोंदणीच्या किट उपलब्धही करून दिल्या असून, जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या उर्वरित आधार किटची पडताळणी करून चालू असलेल्या आधार किट त्यांनी नेण्यास कोणतीही अडचण नाही.
-शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम