वाशिम : निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावतीही स्वीकारणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:33 AM2018-02-08T01:33:29+5:302018-02-08T01:33:45+5:30
वाशिम : ५६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत आरक्षित जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावतीही स्वीकारली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी कळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ५६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत आरक्षित जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावतीही स्वीकारली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी कळविले.
आरक्षित जागांवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशपत्रासोबतच सक्षम प्राधिकार्याने दिलेले जात प्रमाणपत्र, पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र नसल्यास ते प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित समितीकडे अर्ज सादर केल्याची पोचपावती व विहित नमुन्यातील हमीपत्र जोडले असल्यास, असे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे. सुरुवातीला जात वैधता प्रमाणपत्रच स्वीकारले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे इच्छुकांची गैरसोय झाली होती. ५ फेब्रुवारी २0१८ पासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, १0 फेब्रुवारी २0१८ पर्यंत सकाळी ११ वाजतापासून ते दुपारी ४.३0 वाजताच्या दरम्यान नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. आता पोचपावती स्वीकारली जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी १२ फेब्रुवारी २0१८ रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरू होईल. २५ फेब्रुवारी २0१८ रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजतापर्यंत मतदान व २६ फेब्रुवारी २0१८ रोजी मतमोजणी होईल.