वाशिम : मास्क न लावणाऱ्या १२८६ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:52 AM2020-05-04T10:52:29+5:302020-05-04T10:52:49+5:30
संबंधितांकडून २ लाख ५७ हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर वेळोवेळी सांगूनही तोंडाला मास्क न लावता बाहेर फिरणाºया १२८६ जणांवर पोलिसांनी गत काही दिवसांमध्ये कारवाई केली आहे. यामाध्यमातून संबंधितांकडून २ लाख ५७ हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात महसूल व पोलिस प्रशासनाकडून विविध स्वरूपातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. संपूर्ण जगाला हादरवून टाकलेल्या कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडूच नये, बाहेर पडायचे झाल्यास तोंडाला मास्क बांधावा, अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. याऊपरही अनेकजण या सूचनांकडे कानाडोळा करून विनामास्क घराबाहेर पडत आहेत. अशाच १२८६ लोकांवर आतापर्यंत धडक कारवाई करण्यात आली असून संबंधितांकडून २ लाख ५७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय नियम तोडणाऱ्यांची दुचाकी वाहने जप्त करून पोलिस स्टेशनच्या आवारात उभी करण्यात आल्याची माहिती परदेशी यांनी दिली.
विविध स्वरूपातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्यानेच वाशिम जिल्हा तुर्तास तरी कोरोनामुक्त झाला आहे. असे असले तरी धोका टळलेला नाही. नागरिकांनी गाफील न राहता प्रशासनाकडून दिल्या जाणाºया सूचनांचे पालन करावे. नियमबाह्य वर्तन केल्यास निश्चितपणे कारवाईस सामोरे जावे लागेन.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम