वाशिम : पक्षकाराची फसवणूक करणाऱ्या वकिलास बुधवारपर्यंत पोलिस कोठडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:42 PM2018-02-19T17:42:29+5:302018-02-19T17:44:05+5:30
वाशिम : पक्षकाराची फसवणुक करणाऱ्या वकिलास न्यायालयाने बुधवार, २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वाशिम : येथील न्यायालयात दाखल एका प्रकरणात धनादेश जमा करण्याच्या नावाखाली वकिलाने पक्षकाराकडून सही केलेले कोरे धनादेश घेतले. मात्र, त्यावर परस्पर ५ लाख ७० हजार रुपयांची रक्कम टाकून स्वत:च्या खात्यात रक्कम जमा करून पक्षकाराची फसवणुक करणाऱ्या वकिलास न्यायालयाने बुधवार, २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित वकिलाविरूद्ध १८ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता.
कनेरगाव नाका (जि. हिंगोली) येथील अविनाश तायडे (पक्षकार) यांनी हिंगोली येथील वकील गोवर्धन मुळे यांना स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश न्यायालयीन कामकाजासाठी दिले होते. मात्र, या धनादेशावर वकिल मुळे यांनी ५ लाख ७० हजारांची रक्कम टाकून ते स्वत:च्या खात्यात वळते केले. ही रक्कम वाशिम येथील स्टेट बँकेतून १९ डिसेंबर २०१७ रोजी विड्रॉल झाल्याची फिर्याद तायडे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्यावरून पोलीसांनी मुळे यांना अटक करून न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्यांना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.
सोन्याची बनावट नाणी विकणाऱ्या ‘त्या’ दोघांनाही पोलिस कोठडी
सोन्याची बनावट नाणी तयार करून ती विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी १८ फेब्रुवारीला अटक केली. संबंधितांना न्यायालयासमक्ष हजर केले असता, दोघांनाही २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
लक्ष्मण मधुकर चव्हाण (वय ४० वर्षे, रा. पांगरखेडा, ता. मालेगाव) आणि शेरूप सत्तूजी चव्हाण (वय ४५ वर्षे, रा. सुकळी, ता. वाशिम) अशी आरोपींची नावे असून याप्रकरणी गजानन वामनराव वानखेडे यांनी वाशिम शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यात नमूद होते, की नमूद दोन्ही आरोपींनी आपणास बनावट सोन्याचे नाणे विकण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बनावट ३१० नाण्यांसह अटक करून न्यायालयासमक्ष हजर केले असता, दोघांनाही २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.