वाशिम : फसवणुक प्रकरणात आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 03:53 PM2018-08-03T15:53:33+5:302018-08-03T15:55:40+5:30
वाशिम शहर पोलिसांनी दोघांविरूध्द २९ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी महादेव पाठे याला तात्काळ अटक केली होती. त्यानंतर आदित्यनारायण मिश्र (वय ३५, रा. बोरी अडगाव जि. बुलडाणा) याला अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील उत्कृष्ट स्मॉल फायनान्स कंपनीत कार्यरत दोघांनी पाच लाखांचे आमिष दाखवून ४.८० लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी दोघांविरूध्द २९ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी महादेव पाठे याला तात्काळ अटक केली होती. त्यानंतर आदित्यनारायण मिश्र (वय ३५, रा. बोरी अडगाव जि. बुलडाणा) याला अटक करण्यात आली.
वसंतवाडी (ता. मंगरूळपीर जि. वाशिम) येथील संगिता राजेश जाधव यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, उत्कृष्ट स्मॉल फायनान्स मार्फत बचत गटांना कर्ज मंजूर करून देण्याचे त्या काम करतात. या कर्जाच्या वसुलीसाठी लोनसुने ले -आऊट येथील निलेश गोविंदा काळे व महादेव विठ्ठल पाठे हे येत असल्याने ओळख झाली. या ओळखीतून त्यांनी ५० हजार आगाऊ दिल्यास पाच लाख रूपये तातडीने कर्ज मंजूर करून देण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार जाधव यांनी काही ग्राहकांसोबत दोघांची ओळख करून दिली. या दोघांनी कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली अनेक ग्राहकांकडून तब्बल ४ लाख ८० हजार रूपये जमा करून पोबारा केला. त्यानंतर चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनल मध्ये काळे व पाठे या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी महादेव पाठे याला पोलीसांनी गजाआड केले होते. पोलीसांनी पाठे याची कसुन चौकशी केली असता त्याने बुलडाणा जिल्ह्यातील आदित्यनारायण मिश्र याचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचे उघड केले. त्यावरून डी.बी. पथकाचे प्रमुख अमित जाधव व पोलीस शिपाई ज्ञानेदेव म्हात्रे या दोघांनी मिश्र याला ताब्यात घेऊन चौकशीअंती त्यालाही ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली. मिश्र याला न्यायालयाने ४ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.