वाशिम बाजार समिती निवडणूक : अपिलावर सुनावणी झाली; आता निकालाकडे लक्ष
By संतोष वानखडे | Published: April 19, 2023 05:48 PM2023-04-19T17:48:30+5:302023-04-19T17:51:17+5:30
वाशिम बाजार समितीच्या १२ माजी संचालकांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपावर १२ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधकांनी सुनावणी घेतली.
वाशिम - सहा वर्षांसाठी निलंबित झालेल्या वाशिम बाजार समितीच्या १२ माजी संचालकांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपावर १२ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधकांनी सुनावणी घेतली. या सुनावणीचा निर्णय १८ एप्रिल रोजी जाहिर झाला असून, अर्जदाराचे अपिल फेटाळण्यात आल्याने १२ माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले. हा १२ माजी संचालकांना मोठा दिलासा मानला जात आहे.
वाशिम बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी १८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी सात अर्ज बाद ठरल्याने १७६ उमेदवारी अर्ज कायम आहेत. दरम्यान, अर्ज छानणीच्या दिवशी २०१७ ते २०१८ मधील सहा वर्षाच्या निलंबनप्रकरणी माजी १२ संचालकांच्या उमेदवारी अर्जावर उमेदवार प्रांजलकुमार वाळली (जैन) यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, हा आक्षेप फेटाळून लावत १२ माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. याविरोधात जैन यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपिल दाखल केले.
अपिलावर १२ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी सुनावणी घेतली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत राखून ठेवलेला निर्णय जिल्हा उपनिबंधकांनी १८ एप्रिल रोजी जाहिर केला असून, त्याची प्रत १९ एप्रिल रोजी अपिलार्थी प्रांजलकुमार वाळली यांना देण्यात आली. १६ जानेवारी २०१७ पासून सहा वर्षाचा कालावधी हा १५ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होत असल्याने अपिलार्थींचे अपिल अमान्य करण्यात येत आहे तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही योग्य असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे.