वाशिम : सीसीआयचे खरेदी केंद्र बंद; हजारो क्विंटल कापूस घरातच पडून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:13 AM2020-05-17T10:13:50+5:302020-05-17T10:14:16+5:30
हजारो क्विंटल कापूस घरातच पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम तालुक्यासह मानोरा, कारंजा तालुक्यात कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले जात असताना वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र प्रेस मशीन बंद असल्याच्या कारणावरून बंद आहे. मानोरा तालुक्यातही जाचक अटीमुळे कापूस खरेदी प्रभावित होत असल्यामुळे हजारो क्विंटल कापूस घरातच पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका बळावला असून ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून ‘लॉकडाऊन’ लागलेला आहे. यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ‘सीसीआय’कडून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. शेतीविषयक कामांना ‘लॉकडाऊन’मधून शिथिलता मिळाल्यानंतर ती २९ एप्रिल २०२० पासून पुर्ववत सुरू झाली. त्यानुसार, जिल्ह्यातील मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा येथे असलेल्या सीसीआय खरेदी केंद्रावर रितसर आॅनलाईन नोंदणी करून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली; मात्र अनसिंगच्या खरेदी केंद्रातील प्रेस मशीन बंद असल्यामुळे आणि ती दुरूस्त करणारे तज्ज्ञ लोक पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत. यासह मशीनचे नादुरूस्त झालेले ‘स्पेअर पार्टस’ही परराज्यातून आणावे लागतात. त्यामुळे सदर खरेदी केंद्र बंद असून, पुढील काळातही सदर केंद्र लवकर सुरू होण्याची शक्यता देखील नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मंगरूळपीर, कारंजा येथेही शेतकऱ्यांची डोकेदुखी
मंंगरूळपीर व कारंजा तालुक्यात कपाशीचे क्षेत्र बºयापैकी आहे. लॉकडाउनमुळे मार्च महिन्यात कापूस खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नव्हते. आता कारंजा व मंगरूळपीर येथे कापूस खरेदी सुरू झाली; परंतू, जाचक अटीमुळे शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे.
वाशिम तालुक्यातील अनसिंगच्या केंद्रावरील प्रेस मशीन दुरूस्त करण्यासंबंधी प्रयत्न सुरू आहेत. परंतु मशीन दुरूस्त करणारे लोक पंजाब आणि हरियाणा राज्यातील असून ‘लॉकडाऊन’मुळे ते एवढ्यात येतील, याची शक्यता कमीच आहे. हा प्रश्न सुटला नाही तर लवकरच मंगरूळपीरच्या केंद्रावर कापूस खरेदी सुरू करू.
- उमेश तायडे,
सीसीआय कापूस खरेदी केंद्र प्रमुख.