वाशिम : संभाव्य धोका लक्षात घेता संचारबंदी कडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 11:14 AM2020-04-11T11:14:31+5:302020-04-11T11:14:54+5:30
खबरदारी म्हणून संचारबंदी कडक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने खबरदारी घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु जिल्हयाबाजुला असलेल्या जिल्हयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ पाहता खबरदारी म्हणून संचारबंदी कडक करण्यात आली आहे.
चौकाचौकामध्ये मोठया प्रमाणात पोलीस तैनात करुन प्रत्येक नागरिकांची विचारपूस केल्या जात आहे. यामध्ये विनाकारण काही काम नसतांना संचारबंदीत फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांची वाहने जप्त केली जात आहे. घरीच रहा असे आवाहन पोलीस विभागाच्यावतिने करण्यात येत आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमिवर पोलीस अधीक्षकांनी ९ एप्रिल रोजी सोशल मिडीयावर एक व्हीडीओ व्हायरल केला असून अत्यावश्यक काम असल्याशिवाय कोणीही घराच्याबाहेर आढळून आल्यास कारवाई केल्या जाणार आहे. घरीच रहा व आपले व आपल्या परिवाराच्या आरोग्य अबाधित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जो कोणी संचारबंदी नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
संचारबंदीत फिरणाऱ्यांची वाहने जप्त
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. जिल्हयात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी व विनाकारण संचारबंदीत फिरल्याप्रकरणी पोलीस विभागाने ६ ते ९ एप्रिलपर्यंत १७६ वाहने जप्त करुन २०० जणांच्यावर गुन्हे दाखल केलेत.
जिल्हयातील सीमांवर विशेष लक्ष
जिल्हयााच्या सिल करण्यात आलेल्या सीमांवर पोलीसांनी विशेष लक्ष दिले आहे. परजिल्हयातील कोणीच जिल्हयात आगमन करु नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.