वाशिम : संचारबंदीचे उल्लंघन; हजारावर नागरिकांविरूद्ध गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:56 AM2020-04-27T10:56:05+5:302020-04-27T10:56:14+5:30
एक हजार नागरिकांविरूद्ध गुन्हे दाखल केले असून, ४५० च्या आसपास दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : देशभरासह संपूर्ण राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात संचारबंदी व लॉकडाऊन आहे. गत १५ दिवसात संचारबंदीचे उल्लंघन करणाºया जवळपास एक हजार नागरिकांविरूद्ध गुन्हे दाखल केले असून, ४५० च्या आसपास दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. तुर्तास जिल्ह्यात कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हा बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी शक्यतोवर घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक काम असेल तरच एकट्याने घराबाहेर पडावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कुठेही गर्दी करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने वारंवार दिलेल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने गत १५ दिवसांपासून मोहिम उघडली आहे. विनाकारण चकरा मारणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे याप्रकरणी आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास एक हजारावर नागरिकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.
अनेक नागरिक हे शहरासह ग्रामीण भागात कोणतेही अत्यावश्यक काम नसतानाही दुचाकीवरून फिरतात. अशा नागरिकांची पोलीस कर्मचाºयांमार्फत चौकशी करून योग्य कारण निदर्शनात आले नाही तर दुचाकी जप्त केली जात आहे. आतापर्यंत ४५० च्या आसपास दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे पालन करून जिल्ह्यात कुठेही गर्दीे होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयांची गय केली जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक परदेशी यांनी स्पष्ट केले.
कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हून संचारबंदी आदेशाचे पालन करणे अपेक्षीत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कुणी घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर गुन्हे दाखल केले जात आहेत.आतापर्यंत एक हजार नागरिकांविरूद्ध गु्न्हे दाखल केले. - वसंत परदेशी, पोलीस अर्धीक्षक, वाशिम