Washim: तिबार पेरणीनंतरही सोयाबीनवर अळीचे आक्रमण; सात एकरातील पिकांवर फिरविला ट्रॅक्टर!
By संतोष वानखडे | Published: August 29, 2023 05:40 PM2023-08-29T17:40:12+5:302023-08-29T17:41:14+5:30
Washim: आधी कमी पाऊस आणि नंतर अतिवृष्टीमुळे आधीच तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतरही बहरत असलेल्या सोयाबीन पिकावर अळीने आक्रमण केले.
- संतोष वानखडे
वाशिम - आधी कमी पाऊस आणि नंतर अतिवृष्टीमुळे आधीच तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतरही बहरत असलेल्या सोयाबीन पिकावर अळीने आक्रमण केले. त्यामुळे हताश झालेल्या बाबापूर (ता. कारंजा ) येथील शेतकरी बाप-लेकाने मंगळवार, २९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास सात एकरातील सोयाबीन पिकावर चक्क ट्रॅक्टरच फिरविला.
कामरगावनजिक बाबापूर शिवारात ज्ञानेश्वर कावरे आणि प्रवीण कावरे व ज्ञानेश्वर कावरे बाप-लेक शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीला कमी पावसामुळे ही पेरणी उलटली, तर नंतर पेरणी करताच अतिवृष्टीच्या तडाख्याने पेरणी दडपल्याने बियाणे उगवले नाही. त्यामुळे त्यांनी तिबार पेरणी केली. त्यानंतर पावसाचा आधार मिळाल्याने त्यांच्या शेतात सोयाबीनचे पीक बहरू लागले. त्यामुळे उल्हासित झाल्याने त्यांनी डवरणी खुरपणी केली. या पिकाला चांगल्या शेंगा लागून भरपूर उत्पादन पदरी पडेल, या आशेवर ते असतानाच मागील काही दिवसांपासून अळीचा प्रादुर्भाव झाला आणि सोयाबीन पिकाच्या पानांची पूर्ण चाळणी झाली. त्यामुळे ज्ञानेश्वर कावरे आणि त्यांचा मुलगा प्रविण कावरे या बापलेकाने निराश होऊन ७ एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर फिरवून सोयबीनचे पीकच नष्ट केले.