वाशिमच्या ‘सदानंद’ची स्वच्छता जनजागृतीसाठी ‘वाशिम ते दिल्ली’ वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 02:18 PM2020-01-11T14:18:14+5:302020-01-11T14:18:22+5:30
गाडगेबाबांच्या वेशभूषेत स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम : स्वत: हलाखीचे जीवन जगून दुसºयासाठी काहीतरी करण्याची जिद्द असलेले कमीच. परंतु वाशिम शहरातील सदानंद गजानन तायडे हा युवक त्यापासून अपवाद आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाचे धडे देणाºया या ध्येयवेडा या युवकाने चक्क आता गाडगेबाबांच्या वेशभूषेत स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे. यापूर्वीही स्वच्छतेचा संदेश भाविकांपर्यंत पोहचविण्यासाठी पंढरपूर यात्रेदरम्यान तेथे जावून स्वच्छता करुन जनजागृती केली होती.
वाशिम येथील रहिवासी सदानंद गजानन तायडे हा कॉलेज जिवनापासूनच विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. स्वच्छतेबाबत आगळे-वेगळे उपक्रम राबवून त्याने राज्यात आपले नावलौकीक केले आहे. पंढरपूर यात्रेत गाडगेबाबांची वेशभूषा करीत संपूर्ण रस्ते झाडण्याच्या कार्यापासून तर अंधश्रध्दा निर्मूलन, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, मतदार जनजागृतीसह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा जणू विडाच उचलला. आता तर त्याने चक्क स्वच्छता जनजागृतीबाबत दिल्लीपर्यंत सायकलवारी सुरु केली. या रॅलीमध्ये सदानंद ज्या गावात मुक्काम करेल त्या गावाची संपूर्ण आधी स्वच्छता करेल व नंतर त्या गावात पोटासाठी अन्न व ग्रामपंचायत, आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपले मुक्काम करुन पुढचा प्रवास करणार आहे. १० जानेवारीपासून मराठवाडयातील तसेच वाशिमपासून जवळच असलेले गोरेगाव येथील आपल्या शेतामधून सकाळी १० वाजता सुरुवात केली. तेथून सदानंदने आपले गाव वाशिमातून पुढचा प्रवास सुरु केला आहे.
आपला देश स्वच्छ व सुंदर रहावा याकरिता आपण प्रयत्न करीत आहे. आधि गावपातळीवर नंतर शहर पातळीवर आपण मोठया प्रमाणात स्वच्छता अभियान व त्याबाबत जनजागृती केली. आता थेट दिल्लीपर्यंत जावून रस्त्यात लागणाºया सर्व गावांना भेटी देवून जनजागृती करणार आहे. हे करताना मिळणारे आत्मिक समाधान औरच आहे. मी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना झोपडपट्टीत जावून शिक्षण दिले. आज मी दिलेले शिक्षण कितपत कामी आले याकरिता पुन्हा तेथे जावून पाहिले असता ती मुले खळखळ वाचून दाखवित आहेत. त्यापेक्षा त्यांच्या पालकांकडून माणण्यात येत असलेले आभार शब्दात सांगता येत नाहीत.
- सदानंद तायडे, वाशिम