वाशिम : ५२ जिल्हा परिषद गटांसाठी २६ लाखांचा निधी वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 10:56 AM2020-04-25T10:56:59+5:302020-04-25T10:57:17+5:30
५२ जिल्हा परिषद गटांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे २६ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. याकरीता ५२ जिल्हा परिषद गटांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे २६ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी २४ एप्रिल रोजी दिली.
ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकामी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, मीना आणि आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी बैठक घेऊन निधीसंदर्भात नियोजन केले. जिल्हा परिषदेच्या शेष फंडातुन २६ लाखांची तरतुद करण्यात आली. प्रति गट ५० हजार याप्रमाणे ५२ गटांकरीता एकुण २६ लाख रुपयाचा निधी वितरीत करण्यात आला आला. जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूबाबत आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात जनजागृती करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मागील आठवडयात आरोग्य विभागाला दिले होते. त्यानंतर २४ एप्रिल रोजी उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी पुढाकार घेऊन पुढील काळात गावातील लोकांना अडचणीचा सामना करावा लागु नये यासाठी आर्थिक तरतुद करुन ठेवली आहे.
सदरचा निधी हा कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणार असुन तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या स्तरावर उपलब्ध आहे. या निधीचा उपयोग कोविड-१९ चे पेशंट ने-आण करण्यासाठी, वाहन सुविधा उपलब्ध करणे व तातडीची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे . तसेच संबंधित गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुचविलेल्या कामाकरीता हा निधी वापरण्यात येणार असल्याचे डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले.