वाशिम जिल्हय़ात २५0 रोहित्र नादुरुस्त!
By admin | Published: October 17, 2016 02:10 AM2016-10-17T02:10:59+5:302016-10-17T02:10:59+5:30
महावितरणची हलगर्जी; सर्वसामान्यांसह शेतकरी हैराण.
वाशिम, दि. १६- जिल्हय़ात आजमितीस विविध कारणांमुळे तब्बल २५0 रोहित्र नादुरुस्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीदेखील हैराण झाले आहेत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे उद्भवलेली ही समस्या तत्काळ निकाली काढा, अशी मागणी जोर धरत आहे.
गावठाण फिडरवरील तसेच शेतीला वीजपुरवठा करणार्या फिडरवरील रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार गत अनेक दिवसांपासून वाढीस लागले आहेत. निर्माणाधीन वीज उपकेंद्रांच्या प्रलंबित कामांमुळे कार्यान्वित असलेल्या रोहित्रांवर अतिरिक्त विजेचा भार पडत असल्यानेच ही समस्या उद्भवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हय़ात इन्फ्रा-२ या योजनेंतर्गत ५ वीज उपकेंद्रांची कामे होणार होती; मात्र त्यापैकी २ वर्षाच्या काळात तीन वीज उपकेंद्रच उभे राहू शकले. तेही विविध स्वरूपातील तांत्रिक अडचणींमुळे अद्याप सुरू झालेले नाहीत. मागणी अधिक आणि पुरवठा कमी, या प्रकारामुळे वीजपुरवठय़ात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. परिणामी, गावठाण फिडरवरील रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढीस लागले असून यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. तथापि, हिंदू संस्कृतीतील सर्वांत मोठा समजला जाणारा दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने महावितरणने नादुरुस्त असलेले रोहित्र बदलण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.