वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामातील ५०टक्के पेरण्या आटोपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 11:42 AM2021-06-19T11:42:25+5:302021-06-19T11:42:30+5:30
Agriculture News : ५० टक्के क्षेत्रावर खरीपातील पेरण्या आटोपल्या असून काहीठिकाणी बिजही अंकुरल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदा दरवर्षीच्या तुलनेत पाऊस अधिक प्रमाणात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तो बहुतांशी खरादेखिल ठरत आहे. सुरूवातीपासूनच दमदार पाऊस होत असून जिल्ह्यात १८ जूनपर्यंत ५० टक्के क्षेत्रावर खरीपातील पेरण्या आटोपल्या असून काहीठिकाणी बिजही अंकुरल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असतो. त्यानुसार, यंदाही कृषी विभागाकडून पेरणीसाठी नियोजन करण्यात आलेल्या ४ लाख ६० हजार ४५० हेक्टर क्षेत्रापैकी अडीच लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत जिल्हाभर दमदार पाऊस झाल्याने पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे १७ आणि १८ जूनला पावसाने उघडिप दिल्याने शेतकऱ्यांकडून पेरणीला वेग देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, १८ जूनअखेर २ लाख ३० हजार हेक्टरवर खरीपातील सोयाबीनसह इतर पिकांची पेरणी करण्यात आली असून येत्या तीन ते चार दिवसांत उर्वरित शेतकरीही पेरणीचे काम आटोपते घेण्याच्या मन:स्थितीत आहेत.
यंदा सुरुवातीपासूनच दमदार पाऊस कोसळला. तसेच जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला गती दिली आहे. १८ जूनअखेर सुमारे ५० टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली असून येत्या दोन ते तीन दिवसांत हे प्रमाण शंभर टक्क्यांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.
- शंकर तोटावार,
जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी, वाशिम