वाशिम जिल्हा प्रशासनातर्फे वृक्षदिंडी !
By admin | Published: June 29, 2017 07:39 PM2017-06-29T19:39:22+5:302017-06-29T19:39:22+5:30
१ जुलै रोजी वृक्षारोपण केले जाणार असून, पूर्वतयारी व जनजागृती म्हणून २९ जून रोजी जिल्हा प्रशासनातर्फे वाशिम शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चार कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत वाशिम जिल्ह्यात यावर्षी ५ लाख ८ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. १ जुलै रोजी वृक्षारोपण केले जाणार असून, पूर्वतयारी व जनजागृती म्हणून २९ जून रोजी जिल्हा प्रशासनातर्फे वाशिम शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली.
वृक्षारोपण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. १ जुलै रोजी साधारणत: सकाळी ९ वाजेपासून वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहभाग नोंदविता यावा, यासाठी शासनाने कार्यालयीन वेळेत सुट दिली आहे. अन्य स्वयंसेवी संस्थांनादेखील वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आली. दरम्यान, जनजागृती म्हणून २९ जून रोजी वाशिम शहरातून जिल्हा प्रशासनातर्फे टाळ, मृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, वनविभाग व अन्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी या वृक्षदिंडीत सहभागी झाले होते.