Maharashtra Assembly Election 2019: वाशिम जिल्ह्यात सरासरी ३० टक्के मतदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 03:24 PM2019-10-21T15:24:32+5:302019-10-21T15:24:49+5:30
दुपारी १ वाजतापर्यंत सरासरी ३०.३४ टक्के मतदान झाले.
वाशिम : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील १०५२ मतदान केंद्रांवर दुपारी १ वाजतापर्यंत सरासरी ३०.३४ टक्के मतदान झाले. रिसोड विधानसभा मतदारसंघ २८.७६, वाशिम ३२.९६ आणि कारंजा मतदारसंघात २९.४० टक्के मतदान झाले. ९ लाख ५८ हजार ५५१ पैकी दोन लाख ९० हजार ८२४ मतदारांनी मतदान केले.
वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व कारंजा या तीन मतदारसंघात एकूण ४४ उमेदवार निवडणुकीत मैदानात आहेत. जिल्ह्यात ५ लाख ४५१ पुरुष, ४ लाख ५८ हजार ९० महिला व १० तृतीयपंथी असे एकूण ९ लाख ५८ हजार ५५१ मतदार आहेत. जिल्ह्यात १०५२ मतदान केंद्रात २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ९० हजार ८२४ मतदारांनी मतदान केले.
दरम्यान, वाशिम तालुक्यातील तामसाळा येथील मतदान केंद्र येथे सकाळी ११..३० वाजतादरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे एव्हीएम जवळपास एक तास बंद होती. त्यामुळे मतदारांची रांग लागली होती एका तासानंतर एव्हीएम सुरू झाल्याने मतदान पूर्ववत झाले. सुरकंडी ता. वाशिम येथेही सकाळी १०.३० वाजतादरम्यान एव्हीएम बंद पडली होती. दीड तासानंतर एव्हीएम पूर्ववत झाल्याने १२ वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.