वाशिम जिल्हा : शौचालय बांधले; पण वापरच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:03 PM2017-12-19T16:03:21+5:302017-12-19T16:04:33+5:30
वाशिम - बहुतांश ठिकाणी शौचालय बांधकाम पूर्ण झाले; मात्र त्याचा नियमित वापर होत नाही तर काही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचा प्रकार ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे.
वाशिम - बहुतांश ठिकाणी शौचालय बांधकाम पूर्ण झाले; मात्र त्याचा नियमित वापर होत नाही तर काही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचा प्रकार ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे.
राज्य शासनाने २०१९ पर्यंत राज्य हागणदरीमूक्त करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी प्रत्येक गावात व्यक्तीगत आणि सार्वजनिक शौचालये उभारण्याची मोहीम स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगर पंचायततर्फे शौचालय बांधकाम मोहिम युद्धस्तरावर सुरू आहे. पात्र लाभार्थींना ग्रामीण भागात १२ हजार तर शहरी भागात १५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. ग्रामीण भागाचा विचार केला तर आतापर्यंत २४४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित झालेल्या आहेत. दुसरीकडे २४७ ग्राम पंचायतमध्ये शौचालयाच्या कामाची प्रगती अल्प प्रमाणात असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या पाहणीतूनच समोर आले होते. हगणदरीमुक्त घोषित ग्रामपंचायतींमध्ये ‘लोकमत’ चमूने पाहणी केली असता, अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालय सुस्थितीत आढळून आले नाही. काही ठिकाणी केवळ बांधायचे म्हणून शौचालय बांधकाम झाल्याचे दिसून आले. वाकद येथे काही शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असल्याचे दिसून आले. कारंजा तालुक्यातील कामरगाव, धनज, पोहा, धामणी, उंबर्डा आदी ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. या शौचालयाची बिकट अवस्था असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी घाणीचे ठिगारे पाहायला मिळतात. मंगरूळपीर तालुक्यातील चांभई येथील सार्वजनिक शौचालय गत काही महिन्यांपासून बंद असल्याचे दिसून आले. काही शौचालयांमध्ये अन्य साहित्य ठेवल्याचे आढळून आले. तर काही शौचालयांचा वापर नियमित होत असल्याचेही निदर्शनात आले.