वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाचे नवे संकेतस्थळ कार्यान्वित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 02:37 PM2018-05-03T14:37:58+5:302018-05-03T14:37:58+5:30
वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयाचे वाशिम डॉट जीओव्ही डॉट ईन हे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून त्याचे उदघाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले.
वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयाचे वाशिम डॉट जीओव्ही डॉट ईन हे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून त्याचे उदघाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रियांका मीना, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार आदी उपस्थित होते.
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सुचनेनुसार देशातील सर्व जिल्ह्यांचे संकेतस्थळ ‘स्वास’ प्लॅटफॉर्मवर सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात ‘स्वास’ प्लॅटफॉर्मवर संकेतस्थळ सुरु करणाऱ्या पहिल्या पाच जिल्ह्यात वाशिमचा समावेश आहे. अधिक सुरक्षित, सुटसुटीत व सहज हाताळता येणाऱ्या या संकेतस्थळावर वाशिम जिल्ह्याविषयी सर्व माहिती, नवीन घडामोडी, पर्यटनस्थळे,विविध उपक्रम, या उपक्रमांशी निवडीत छायाचित्रे व व्हिडीओ आदी माहिती मराठी, इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात आली असून ही माहिती सातत्याने अद्ययावत केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, त्यांचे सहकारी मोहम्मद सिद्दिक अहेमद, प्रदीप ठाकरे यांनी हे संकेतस्थळ तयार करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांना महाराष्ट्र ‘स्वास’टीमचे आमोद सूर्यवंशी, श्रीमती इरेणी, राजेश सावळे यांचे सहकार्य लाभले. तसेच दिल्ली येथील ‘स्वास’ टीमने या कामासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.