वाशिम जिल्हा कोरोनामुक्त ; एकमेव रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह, रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:57 AM2020-04-24T11:57:22+5:302020-04-24T11:58:55+5:30

दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा तुर्तास कोरोनामुक्त झाला आहे.

Washim District Coronafree; Both reports of single patient were negative, hospital discharge | वाशिम जिल्हा कोरोनामुक्त ; एकमेव रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह, रुग्णालयातून सुटी

वाशिम जिल्हा कोरोनामुक्त ; एकमेव रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह, रुग्णालयातून सुटी

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनावर मात केलेल्या या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी मिळाली.रुग्णाचे २० दिवसानंतरचे दोन्ही अहवाल २३ एप्रिल रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील मेडशी (ता.मालेगाव) येथील ५९ वर्षीय एका कोरोनाबाधित रुग्णाचे २० दिवसानंतरचे दोन्ही अहवाल २३ एप्रिल रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले असून, सदर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा तुर्तास कोरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, कोरोनावर मात केलेल्या या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी मिळाली.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध स्वरूपातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, १ एप्रिल रोजी मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील एका ५९ वर्षीय इसमाला संदिग्ध म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्याचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविल्यानंतर, ३ एप्रिल रोजी संबंधित रुग्णाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने मोठी खळबळ उडाली होती. संबंधित रुग्णावर १४ दिवस आरोग्य विभागाने विशेष लक्ष ठेवून १५ व्या दिवशी त्याचा ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आला. १७ एप्रिलला हा अहवाल निगेटिव्ह आला; मात्र पुढच्या २४ तासानंतर पाठविण्यात आलेल्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली होती. त्यानंतर २० आणि २१ व्या दिवशी सदर रुग्णाचा ‘थ्रोट स्वॅब’ पुन्हा २२ एप्रिल रोजी नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. २३ एप्रिल रोजी रात्री उशिरा सदर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने वाशिम जिल्हा तुर्तास कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनावर मात केलेल्या सदर रुग्णाला २४ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. दरम्यान जिल्हा कोरोनामुक्त झाला असला, तरी पुढील खबरदारी म्हणून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कुठेही गर्दी करू नये, लॉकडाउन व संचारबंदी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी केले.

Web Title: Washim District Coronafree; Both reports of single patient were negative, hospital discharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.