वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 02:36 PM2019-11-20T14:36:50+5:302019-11-20T14:37:04+5:30
७ जानेवारीला मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी मुंबईत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणूकीचा बिगुल वाजविला. आयोगाने निवडणूकीसाठी ७ जानेवारी २०२० चा मुहूर्त ठरविला . या मुहूर्ताची वाट पाहत बसलेल्या राजकारण्यांना दिलासा मिळाला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राजकारण्यांनी जिल्हाभरात राजकीय वातावरण तापविण्यास सुरुवात केली होती.
वाशिम जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ जानेवारीला मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी मुंबईत केली. त्यानुसार जिल्हयात आज, १९ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी १८ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
वाशिम जिल्हा परिषदेत एकूण ५२ गट तर ६ पंचायत समिती मिळून १०४ गणाचा समावेश आहे. यामध्ये जिल्हापरिषदेच्या ५२ गटामध्ये गतवेळच्या संख्याबळानुसार सर्वाधिक सदस्य संख्या काँग्रेस पक्षाची आहे. त्या खालोखाल राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ८ सदस्य आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाचे ६, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ४, भारिप-बमसंचे ३ तर ६ सदस्य अपक्ष होते. दरम्यान, वाशिम जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर राज्य शासनाने ३० डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. तथापि, मुदतवाढ संपुष्टात आल्याने आणि निवडणूक घेणे शक्य न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या प्रशासकपदी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होईपर्यंत प्रशासकांकडूनच जिल्हा परिषदेचा कारभार हाकला जाणार आहे.
अध्यक्षपद सर्वसाधारण नामाप्रसाठी राखीव
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार विविध प्रवर्गासाठीच्या आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) आरक्षित करण्यात आला आहे. . आरक्षण काढताना २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशनपत्र सादर करणे- १८ ते २३ डिसेंबर २०१९
- नामनिर्देशनपत्रांची छाननी- २४ डिसेंबर २०१९
- अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- ३० डिसेंबर २०१९
- अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- १ जानेवारी २०२०
- मतदानाचा दिनांक- ७ जानेवारी २०२०
- मतमोजणीचा दिनांक- ८ जानेवारी २०२०