वाशिम जिल्हा : चार तालुक्यातील ४० महिलांना शेतमजुर महिलांना एकचाकी हातकोळप्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 05:17 PM2017-12-18T17:17:56+5:302017-12-18T17:19:40+5:30
रिसोड: आत्माच्यावतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्यावतीने शिफासित केलेल्या एकचाकी हातकोळप्यांचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील शेतमजुर महिलांना देण्यात येत आहे.
रिसोड: आत्माच्यावतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्यावतीने शिफासित केलेल्या एकचाकी हातकोळप्यांचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील शेतमजुर महिलांना देण्यात येत आहे. या अंतर्गत रिसोड येथील करडा कृषी विज्ञान केंद्राच्या गृहशाखेकडून चार तालुक्यातील ४० महिलांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देऊन हातकोळप्यांचे वाटप त्यांना करण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र करडा येथे आयोजित या प्रशिक्षण आणि हातकोळपे वाटप कार्यक्रमाला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. डी. एल. जाधव, उपसंचालक अनिसा महाबळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे, विस्तार शिक्षण विषय विशेषज्ञ एस. के. देशमुख, कार्यक्रम सहाय्यिका ए. एन. वाटाणे यांची उपस्थिती होती. यावेळी ए. एन. वाटाणे यांनी उपक्रमाबाबत शेतमजुर महिलांना माहिती दिली. शेतीत आंतरमशागतीच्या कामात महिलांचा मोठा सहभाग असतो. ही कामे करीत असताना बरेचदा त्यांची शारीरिक स्थिती अनैसर्गिक होते. त्यामुळे शारीरिक थकवा येऊन कार्यक्षमता कमी होते आणि कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठीचे व मानेचे आजार कायमस्वरूपी उद्भवतात म्हणूनच शरिराच्या अवयवांचे संतुलन राखून काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले, तसेच एकचाकी हातकोळपे ढकला व चालवा पद्धतीचे असून, वापरण्यास सोयीचे आहे. या हातकोळप्याचा वापर २२.५ सेमी, ३० सेमी व ४५ सेमी अंतर असलेल्या दोन ओळीतील पिकांसाठी केला जातो. एकचाकी हातकोळप्याचा वापर केल्यास ५० ते ६० टक्के वेळेची आणि पैशाची बचत होऊ शकते, असेही त्यांनी सादरीकरणासह पटवून दिले. डॉ. जाधव यांनी उपस्थित लाभार्थी महिलांना शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची चर्चा करून शेतीमधील उत्पादनात वाढ करण्याचे आवाहन केले, तर डॉ. काळे यांनी शेतीपुरक व्यवसायातील तंत्रज्ञान महिलांनी अवगत करून चुल आणि मुल या पलिकडे जाऊन चौकसवृत्ती ठेवावी, असे सांगितले. अनिसा महाबळे यांनी आत्माची कार्यपद्धती आणि महिलांनी त्याच्या उपयोग कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. एस. के. देशमुख यांनी कृविकेच्या तांत्रिक बाबी, सेवा व स्वंयरोजगार प्रशिक्षणाबाबत माहिती देऊन राज्यस्तरी अग्रोटेक २०१७ च्या प्रदर्शनीत सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला वाशिम, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोड तालुक्याील महिला लाभार्थी उपस्थित होत्या.