वाशिम जिल्ह्यात स्मार्ट ग्राम निवडीसाठी मुहूर्त मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 02:19 PM2019-08-23T14:19:24+5:302019-08-23T14:19:44+5:30

स्मार्ट ग्राम निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे आहे.

Washim district does not get smart village! | वाशिम जिल्ह्यात स्मार्ट ग्राम निवडीसाठी मुहूर्त मिळेना!

वाशिम जिल्ह्यात स्मार्ट ग्राम निवडीसाठी मुहूर्त मिळेना!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात तालुका स्मार्ट ग्राम निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे आहे. तथापि, यासाठी वारंवार तारखेत बदल करूनही ही प्रक्रिया अद्याप पार पाडता आली नाही.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात 'इको व्हिलेज' ही योजना शासनाने बंद करीत नव्या स्वरूपात 'स्मार्ट ग्राम'ही योजना साकारली आहे. स्मार्ट ग्राम योजनेत तालुकास्तरावर निवडीसाठी ग्रामपंचायतींना नमुद निकषानुसार स्व-मुल्यांकन करून गुणांकन देण्यात येते. या योजनेत सहभाग घेवू इच्छिणाच्या संबंधित ग्रामपंचायती स्व-मुल्यांकन करून त्यांचे प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयांस पाठवतात. प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या एकूण स्व-मुल्यांकन प्रस्तावांपैकी अधिक गुण प्राप्त २५ टक्के ग्रामपंचायतीची तालुका तपासणी समिती तपासणी करुन त्यांना गुणांकन देते. तालुकास्तरावरील सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतीची तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवड करून ती ग्रामपंचायत जिल्हा स्तरावरील द्वितीय स्पर्धेकरीता पात्र ठरते. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २०१८-१९ साठी सहा तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
या मानोरा तालुक्यातील गिरोली, कारंजा तालुक्यातील विळेगाव, मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, वाशिम तालुक्यातील काटा, रिसोड तालुक्यातील बिबखेडा आणि मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींचे पुर्नमुल्यांकन करून जिल्हा स्मार्ट ग्राम निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्मार्ट ग्राम तपासणी समितीचे अध्यक्ष यांनी जिल्हा तपासणी समितीचे सदस्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग, तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. वाशिम यांना सुचित केले. त्यानंतर ३१ मे रोजी पूर्व नियोजित तपासणीची तारिख बदलून सहा ग्रामपंचायतींसाठी गिरोली आणि विळेगावसाठी १ जुन, सायखेडा, काटासाठी ४ जून, तर बिबखेडा आणि ढोरखेडासाठी ६ जून २०१९ ची तारिख निश्चित करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतींनी तयारीही केली; परंतु या तारखेत ७ आॅगस्ट रोजी बदल करून गिरोली, विळेगाव आणि सायखेडा ११ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी १२ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. त्यापूर्वीच ९ आॅगस्ट रोजी पुन्हा पुनर्मुल्यांकनासाठी तपासणीच्या तारखेत बदल करून गिरोली, विळेगाव आणि सायखेडा १३ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी १४ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. या तारखेलाही तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे मुल्यांकन करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींनी तपासणीसाठी केलेली तयारी व्यर्थ ठरली आहे.
दोन महिन्यांत तीन वेळा तारखांत बदल
तालुकास्तरावर स्मार्ट ग्राम योजनेत प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींतून जिल्हा स्तर स्मार्ट ग्राम निवडीसाठी पुनर्मुल्यांकनाच्या तारखेत दोन महिन्यांत तीन वेळा बदल करण्यात आला. त्यामुळे तालुकास्तरावर प्रथम आलेल्या स्मार्ट ग्रामपंचायतींनी पुनर्मुल्यांकनासाठी केलेली तयारी व्यर्थ ठरली आहे. पुनर्मुल्यांकनाच्या तारखेत वारंवार होणाऱ्या बदलामुळे तालुकास्तर स्मार्ट ग्रामपंचायतीतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ही प्रक्रिया तातडीने पार पाडली जावी, अशी अपेक्षा संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य व गावकरी मंडळीकडून व्यक्त होत आहे.


जिल्हास्तर स्मार्ट ग्रामनिवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामच्या पुनर्मुल्यांक नाची प्रक्रिया काही कारणांमुळे प्रलंबित ठेवावी लागली. तथापि, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण पार पाडण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सुचना संबंधित सहा ग्रामपंचायतींना देण्यात येतील.
- दीपक कुमार मीना
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, वाशिम

Web Title: Washim district does not get smart village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.