वाशिम जिल्ह्याने ‘महसूल’चे उद्दिष्ट ओलांडले; शासन तिजोरीत ४७.९२ कोटी जमा
By संतोष वानखडे | Published: April 9, 2023 06:40 PM2023-04-09T18:40:09+5:302023-04-09T18:40:28+5:30
राज्य शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी जमीन महसूल, गौण खनिजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न महत्त्वपूर्ण मानले जाते.
वाशिम : जिल्हा महसूल प्रशासनाला २०२२-२३ या आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट ४६.४७ कोटी असताना, ३१ मार्चपर्यंत ४७.९२ कोटी रुपये वसुल करण्यात आले. मानोरा, वाशिम तहसिलने उद्दिष्ट ओलांडले तर मंगरूळपीर, रिसोड तहसिल कार्यालयाला ५० टक्क्याचा आकडाही गाठता आला नाही.
राज्य शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी जमीन महसूल, गौण खनिजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न महत्त्वपूर्ण मानले जाते. दरवर्षी राज्य शासनाकडून जिल्हा महसूल प्रशासनाला १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत महसूल वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येते. वाशिम जिल्हा महसूल प्रशासनाला २०२२-२३ या वर्षात ४६ कोटी ४७ लाख रुपयांचे उद्दिष्ट मिळाले होते. उद्दिष्टपूर्तीकरीता जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आढावा घेतला. शेवटच्या मार्च महिन्यात महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी धावपळ होऊ नये म्हणून दरमहिन्याला महसूल वसुलीकडे लक्ष देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सर्वच तहसिलदारांनी महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य दिले. परंतू, केवळ मानोरा व वाशिम तहसिल कार्यालयाचा अपवाद वगळता उर्वरीत चारही तहसिल कार्यालयाला महसूल वसुलीचा १०० टक्के आकडा गाठता आला नाही.
मालेगाव तहसिल कार्यालयाने ८०.९५ टक्के तर कारंजा तहसिल कार्यालयाने ५६.८८ टक्के महसूल वसूल केला. रिसोड व मंगरूळपिर तहसिल कार्यालयाला तर ५० टक्क्याचा आकडाही गाठता आला नाही. वाशिमने सर्वाधिक १३.७२ कोटींचा महसूल वसूल केला असून ही टक्केवारी १०३.६२ अशी येते. मानोरा तहसिल कार्यालयाने उद्दिष्टपूर्तीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत २०६.६२ टक्के महसूल वसूल केला. सलग दुसऱ्या वर्षीही जिल्हा महसूल प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल वसूल करण्यात बाजी मारली.