सायखेडाच्या शेतकऱ्याची किमया: अॅपल बोराच्या आधारे लाखाचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:50 PM2017-12-08T14:50:48+5:302017-12-08T14:52:01+5:30
सायखेडा: अवघ्या २० गुंठे क्षेत्रात अॅपल बोराची झाडे जगवून त्या आधारे लाखाचे उत्पन्न घेण्याची किमया सायखेडा येथील प्रगतशील युवा अल्पभूधारक शेतकरी उमेश गहुले यांनी केली आहे.
सायखेडा: अवघ्या २० गुंठे क्षेत्रात अॅपल बोराची झाडे जगवून त्या आधारे लाखाचे उत्पन्न घेण्याची किमया सायखेडा येथील प्रगतशील युवा अल्पभूधारक शेतकरी उमेश गहुले यांनी केली आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा या सांसद आदर्श ग्रामच्या शिवारात उमेश गहुले यांची वडिलोपार्जित ५ एकर शेती आहे. लहानपणीच पित्याचे निधन झाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी शेतीचा भार उमेशच्या खांद्यावर आला. काही कळत नसतानाही आईला सोबत घेऊन त्यांनी शेती कसण्यास सुरुवात केली. हळहळू शेतीचे तंत्र अवगत झाल्यानंतर त्यांनी कल्पकतेच्या जोरावर वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेतले. मागील चार वर्षांपासून ते पाच एकरातील दीड एकर शेतीत फळपिके घेत आहेत. यामध्ये एक एकर शेतात पपईची लागवड करून त्याद्वारे त्यांनी दोन लाखांच्या जवळपास उत्पन्न घेतले, तर अर्धा एकर शेतात त्यांनी अॅपल जातीच्या बोराची झाडे लावली. गतवर्षीपासून त्यांना या अॅपल बोराचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. अतिशय कमी पाण्याचा वापर करून त्यांनी झाडे जगविली. गतवर्षी त्यांना या बोराच्या उत्पादनातून एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदाही त्यांनी अॅपल बोराच्या विक्रीतून आतापर्यंत ८० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले असून, पुढे आणखी ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फळपिकांशिवाय उर्वरित दीड एकर शेतीत त्यांनी सोयाबीनची पेरणी करून त्याद्वारेही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळविले आहे. त्यांच्या शेतातील बोरीच्या झाडांची स्थिती पाहता किमना ६० हजार उत्पन्न मिळेल, असे दिसत आहे.