वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाऊलवाट रुतली चिखलात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 02:52 PM2019-08-03T14:52:17+5:302019-08-03T14:52:40+5:30
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतांमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या शंभरावर पांदन रस्त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतांमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या शंभरावर पांदन रस्त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे. ओबडधोबड स्वरूपात असलेल्या या रस्त्यांवर सद्य:स्थितीत पावसाच्या पाण्याचे डबके आणि चिखल साचल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे दरवर्षीच पावसाळ्यात हा प्रश्न उद्भवत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी पालकमंत्री पाणंद, शेत रस्ते योजना जाहीर केली. आवश्यक असलेली यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी आणि पिकलेला शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या दर्जाच्या शेतरस्त्यांची गरज आहे. विशेषत: पावसाळ्यात पेरणी, मळणी, कापणी व इतर कामे यंत्रांमार्फत केली जातात. या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पांदन रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील शंभरपेक्षा अधिक ठिकाणच्या पांदन रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर सर्वत्र पावसाच्या पाण्याचे डबके साचण्यासह चिखल निर्माण झाल्याने त्यातून मार्गक्रमण करणे शेतकºयांना अशक्य होत आहे.
असे असताना अतिक्रमणात अडकलेले पांदन रस्ते मोकळे करणे, गौणखनिज वापरून अशा रस्त्यांची किमान डागडूजी करणे किंवा शक्य असेल त्याठिकाणी चांगल्या दर्जाचे पांदन रस्ते तयार करण्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. यामुळे शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
(प्रतिनिधी)