जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे ‘वराती मागून घोडे’ : आधी कार्यक्रम नंतर प्रदर्शनीचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:59 PM2018-03-29T13:59:09+5:302018-03-29T13:59:09+5:30
वाशिम : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तुंची जिल्हा प्रदर्शनी व विक्री २९ मार्च ते ३१ मार्च जुन्या जिल्हा परिषद परिसरात सुरु करण्यात आली. यामध्ये मात्र २९ मार्चला कार्यक्रम पार पडला व ३० मार्च रोजी या कार्यक्रमाचे रितसर उदघाटन करण्यात येणार आहे
नंदकिशोर नारे ।
वाशिम : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तुंची जिल्हा प्रदर्शनी व विक्री २९ मार्च ते ३१ मार्च जुन्या जिल्हा परिषद परिसरात सुरु करण्यात आली. यामध्ये मात्र २९ मार्चला कार्यक्रम पार पडला व ३० मार्च रोजी या कार्यक्रमाचे रितसर उदघाटन करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होत असून हा प्रकार म्हणजे ‘वराती मागून घोडे’ नेण्याचा प्रकार आहे.
कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन म्हटले की पूर्वतयारी दिसून येते. परंतु जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत २९ ते ३१ मार्चपर्यंत आयोजित कार्यक्रमाची माहिती जवळपास सर्वांनाच २९ मार्चच्या पूर्वसंध्येला झालेली दिसून आली. या कार्यक्रमाची पत्रिका प्रकाशित करण्यात आली त्यामध्ये सुध्दा २९ ते ३१ मार्च कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आला. परंतु २९ मार्चला काय कार्यक्रम आहेत हे सोडून ३० मार्चला उदघाटन व ३१ मार्चला समारोपाचा उल्लेख करण्यात आला आहे. जर ३० मार्चला उदघाटन करायचे होते तर मग २९ मार्चपासून कार्यक्रमाची रुपरेषा आखण्याचे काय काम अशी चर्चा यानिमित्ताने जोर धरत आहे.
या प्रदर्शन कालावधीत संबधित अधिकारी , कर्मचारी यांना त्यांच्या कामाची जबाबदारी सुध्दा सोपविण्यात आली. यामध्ये स्वागत समिती व संपर्क समिती, पत्रिका वाटप समिती प्रमुख जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिक्षक पी.एन. नांदे तर त्यांना सहायक कर्मचारी म्हणून एम.जी. नायक, अभिजित सिरसाट, वाय.आर. चोपडे, शाम मापारी यांचा समावेश आहे. स्टॉल देखरेख समितीमध्ये समितीप्रमुख एस.एस. जगताप, नियंत्रण , नोंदणी व कंट्रोल रुम प्रमुख एस.व्ही. पवार , प्रसिध्दी समिती राम श्रृंगारे, निवास देखरेख समिती जे.पी. सारसकर, भोजन समिती एस. जी. कडेकर, सांस्कृतीक समिती एम. जी. नायक, अहवाल लेखन समिती प्रमुख नागेश थोरात व सहायक म्हणून कर्मचारी देण्यात आले आहेत.
पालकमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने आधी कार्यक्रम नंतर उदघाटन
- २९ मार्चपासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन ३० मार्च रोजी ठेवण्यामागे पालकमंत्री यांच्या व्यस्त कामामुळे ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
- २९ मार्च रोजी अस्मिता योजनेबाबत सकाळी ११.३० वाजता जनजागृती करण्यात आली. यावेळी स्टॉल उभारण्याचे काम दिसून आले तर केवळ एक चहाचे स्टॉल दिसून आले.
- याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन एस. माने यांच्याशी सपंर्क साधला असता दोन वेळा त्यांनी भ्रमणध्वनी कट केला.
‘अस्मिता’ स्वच्छता व आरोग्याचा आयाम चित्ररथ यात्रेतर्फे जनजागृती
अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाव्दारे ग्रामीण भागात महिलांना अस्मिता या ब्रँड नावाने माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्यात येत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रदर्शनीस्थळी २९ मार्च रोजी सकाळी ११.१५ वाजता ‘अस्मिता’ स्वच्छता व आरोग्याचा आयाम चित्ररथ दाखल झाला होता. यावेळी जनजागृती करण्यात आली. येथे मात्र केवळ आयोजक मंडळीतील काही कर्मचारी यांचाच समावेश दिसून आला. अस्मिता योजनेची चमू पलिकडे येथे कोणीच नसल्याने या चित्ररथा जनजागृतीचा फायदा तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.