वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:36 PM2018-09-25T13:36:09+5:302018-09-25T13:36:30+5:30
वाशिम : जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच चांगले पर्जन्यमान झाले असून पावसाने २५ सप्टेंबरपर्यंत ९५ टक्क्याची सरासरी गाठली आहे. यामुळे १३४ सिंचन प्रकल्पांपैकी १०० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच चांगले पर्जन्यमान झाले असून पावसाने २५ सप्टेंबरपर्यंत ९५ टक्क्याची सरासरी गाठली आहे. यामुळे १३४ सिंचन प्रकल्पांपैकी १०० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, २५ सप्टेंबरपर्यंत वाशिम तालुक्यात ८७.५७, मालेगाव ९७.१२, रिसोड ८१.६२, मंगरूळपीर १०२, मानोरा ९३.३३ आणि कारंजा तालुक्यात १०८.४१ टक्के पर्जन्यमान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकबुर्जी आणि सोनल या मध्यम प्रकल्पांसह अधिकांश लघूप्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. असे असले तरी मध्यंतरी पावसाने मारलेली दीर्घ दडी आणि पिकांवर झालेल्या विविध स्वरूपातील किडींच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबिनपासून विशेष उत्पन्न हाती पडणार नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मात्र, सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याने आगामी रब्बी हंगामात महावितरणने साथ देवून पुरेशा प्रमाणात वीज पुरविल्यास गहू, हरभरा यासह अन्य पिकांपासून विक्रमी उत्पन्न घेणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.
सोमवारच्या पावसाचा सोयाबिनला फटका; तूर, कपाशीला जीवदान!
जिल्ह्यात सोमवार, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे ऐन सोेंगणीच्या स्थितीत आलेल्या सोयाबिनला जबर फटका बसला; तर तूर आणि कपाशीला हा पाऊस जीवनदान देणारा ठरला. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सोयाबिन सोंगणीला सुरूवात झाली आहे. अशातच सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकºयांची एकच धावपळ उडाली. अनेकांचे सोंगलेले सोयाबिन पावसामुळे खराब झाले असून सरासरी उत्पन्नात यामुळे मोठ्या प्रमाणात घट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.