वाशिम जिल्हा : मालेगाव, रिसोड तालुक्यास गारपिटीने झोडपले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:56 AM2018-02-12T01:56:48+5:302018-02-12T01:58:43+5:30

वाशिम: जिल्हय़ात रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळपासून मोठय़ा प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यातील २५ गावांना गारपिटीने झोडपले. यामुळे गहू आणि हरभरा या पिकांना जबर फटका बसला असून, महागाव (ता. रिसोड) येथील यमुनाबाई हुंबाड ही वृद्ध महिला गारपिटीच्या तडाख्यात सापडून मृत्युमुखी पडली. 

Washim district: Malegaon and Risod taluka have aborted! | वाशिम जिल्हा : मालेगाव, रिसोड तालुक्यास गारपिटीने झोडपले!

वाशिम जिल्हा : मालेगाव, रिसोड तालुक्यास गारपिटीने झोडपले!

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हय़ात सर्वदूर जोरदार अवकाळी पाऊस गहू, हरभरा पिकांना जबर फटकामहसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हय़ात रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळपासून मोठय़ा प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यातील २५ गावांना गारपिटीने झोडपले. यामुळे गहू आणि हरभरा या पिकांना जबर फटका बसला असून, महागाव (ता. रिसोड) येथील यमुनाबाई हुंबाड ही वृद्ध महिला गारपिटीच्या तडाख्यात सापडून मृत्युमुखी पडली. 
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला असून, रविवारी सकाळपासूनच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. वाशिम, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या चार तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस, तर मालेगाव आणि रिसोड या दोन तालुक्यातील अनेक गावांमध्ये निंबूच्या, तर काही गावांमध्ये त्याहीपेक्षा मोठय़ा आकाराची गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा या रब्बीमधील पिकांसह भाजीपाला आणि संत्रा, निंबू या फळवर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. गारपिटीमुळे आंब्याचा मोहोरही मोठय़ा प्रमाणात झडल्याचे वृत्त आहे. 
रिसोड तालुक्यात रिसोड शहर परिसरातील शेतशिवारांसह केनवड, कोयाळी, गणेशपूर, बाळखेड, गौंढाळा, जांब आढाव, उकीरखेड, महागाव, वाकद, बोरखेडी, शेलू खडसे या गावांमध्ये सर्वाधिक गारपीट झाली. विशेष म्हणजे रिसोड येथील शेतकरी तथा नगरसेवक सतीश इरतकर यांच्या शेतात पडलेली गार साधारणत: २५0 ते ३00 ग्रॅमची होती. दरम्यान, आमदार अमित झनक, विष्णुपंत भुतेकर, विजय गाडे, घनश्याम मापारी, बाजीराव पाटील हरकळ, डॉ. जितेंद्र गवळी, तहसीलदार राजू सुरडकर, कृषी सहायक तोटेवार यांच्यासह गावागावातील तलाठी, मंडळ अधिकार्‍यांनी नुकसानग्रस्त गावांमध्ये भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, भर जहागीर येथे रात्री ९.३0 वाजतादरम्यान गारपीट व पाऊस झाला.
मालेगाव तालुक्यात गारपिटीने १२५ एकरवरील रब्बी पिकांचे नुकसान 
मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे सुमारे १२५ एकरवरील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. तालुक्यातील धारपिंप्री, कोळगाव बु., कोळगाव खु., चांडस, तरोडी, खरोडी, सावळद आदी गावांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. दरम्यान, तहसीलदार राजेश वझीरे, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, तलाठी घुगे, काळे, नागे, उमाळे, गवळी, कृषी सहायक वाळूकर, सरपंच विशाल मानवतकर, माजी सरपंच तहकीक, पोलीस पाटील शेंडगे आदींनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली.

तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित!
रविवारी सकाळपासून सोसाट्याचा वारा सुटून पाऊस कोसळला. यामुळे अनेक ठिकाणच्या वीज वाहिन्या तुटल्या. रोहित्रांमध्येही अचानक बिघाड उद्भवला. वाशिममध्ये वीज पुरवठा करणार्‍या १३३ केव्ही उपकेंद्रातील संचातही यादरम्यान बिघाड झाल्याने २ तास विद्युत पुरवठा खंडित होता. रिसोड, मालेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची पुरती तारांबळ उडाली.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने नुकसानाच्या सर्वेक्षणाची कार्यवाही सुरू !
जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव तालुक्यात ११ फेब्रुवारी रोजी सकाळी झालेल्या गारपिटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्राथमिक पाहणी करण्यात आली. मालेगाव तालुक्यातील कोळगाव खुर्द, कोळगाव बु., तरोडी, खरोडी, सावळद व रिसोड तालुक्यातील नेतन्सा, आंचळ, जोगेश्‍वरी, केनवड, कुकसा, पिंप्री सरहद, गणेशपूर, कळमगव्हाण, जांभआढाव, कोयाळी बु., वडजी, करंजी, लेहणी, बाळखेड आदी गावांमधील नुकसानाची प्राथमिक पाहणी करून तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांना सविस्तर सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले.
 

Web Title: Washim district: Malegaon and Risod taluka have aborted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम