‘हर हर महादेव’च्या गजराने वाशिम जिल्हा दुमदुमला
By संदीप वानखेडे | Published: September 11, 2023 06:13 PM2023-09-11T18:13:22+5:302023-09-11T18:13:35+5:30
कावड यात्रेला विविध मान्यवरांनी भेट दिली आणि शिवभक्तांच्या उत्साहात भर घातली.
वाशिम : श्रावण महिना हा विविध व्रतवैकल्यांचा असून, या महिन्याच्या चवथ्या व शेवटच्या सोमवारी ११ सप्टेंबर रोजी जिल्हाभरातील शिवमंदिरावर भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी झाली. ‘हर हर महादेव’च्या गजरात जिल्हा दूमदूमून गेला.
वाशिम शहरासह जिल्हाभरात दरवर्षी कावड यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा या प्रमुख शहरांत श्रावण सोमवारी पवित्र नदी, तिर्थक्षेत्रावरील जल कावडीने आणून महादेवाला जलाभिषेक करण्यात येतो. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी ढोल-ताशांचा गजरात हर हर बोला महादेवचा जयघोष करीत कावड यात्रेचे वाशिमनगरीत सकाळीच आगमन झाले.
शिवभक्तांसह लहान मुलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. कावड यात्रा पाहण्यासाठी शहरात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. ठिकठिकाणी शिवभक्तांना चहा, पाणी, नाष्टा, फळ वाटप करण्यात आले. तसेच कावड यात्रेला विविध मान्यवरांनी भेट दिली आणि शिवभक्तांच्या उत्साहात भर घातली.