वाशिम जिल्ह्याचा ८७.३७ टक्के निकाल!
By admin | Published: June 13, 2017 08:03 PM2017-06-13T20:03:54+5:302017-06-13T20:03:54+5:30
जिल्ह्यात रिसोड तालुका प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ८७.३७ टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.०२ तर मुलींची टक्केवारी ९०.४८ आहे.
जिल्ह्यात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २० हजार ९३२ विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली होती. यापैकी २० हजार ८१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ११ हजार ८७३ मुले व ८ हजार ९४३ मुलींचा समावेश आहे. यापैकी १८ हजार १८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये १० हजार ९४ मुले व ८ हजार ९२ मुलींचा समावेश आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.०२ तर मुलींची टक्केवारी ९०.४८ आहे. वाशिम तालुक्याचा निकाल ८७.९८ टक्के लागला आहे. मालेगाव तालुका ८४.४४, रिसोड ९०.२५, कारंजा ८६.७५, मंगरूळपीर ८७.४३ व मानोरा तालुक्याचा निकाल ८४.८४ टक्के आहे.