वाशिम जिल्ह्यात पावसाअभावी १३ टक्के क्षेत्रावरील पेरणी खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 12:08 PM2021-06-29T12:08:59+5:302021-06-29T12:09:08+5:30
Agriculture News : पाऊस झाल्याशिवाय पेरणीची कामे हाती घ्यायची नाही, या मानसिकतेत काही शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामात पेरणीलायक क्षेत्र एकूण ४ लाख ६२ हजार हेक्टर आहे. त्यापैकी २८ जूनअखेर ३ लाख ५३ हजार हेक्टरवर आतापर्यंत विविध पिकांची पेरणी झाली आहे; तर पावसाअभावी १३ टक्के क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे. दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणीची कामे हाती घ्यायची नाही, या मानसिकतेत काही शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीन पेऱ्याला सर्वाधिक प्राधान्य दिलेले आहे. सोयाबीनचे सरासरी पेरी क्षेत्र ३ लाख ४ हजार हेक्टर असून २८ जूनपर्यंत २ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याचे प्रमाण ९२ टक्के आहे. यापाठोपाठ तूर ५१६ हेक्टरवर (९४ टक्के) आणि कापूसची १८० हेक्टरवर (९४ टक्के) पेरणी आटोपली आहे. खरीप ज्वारी, मुंग, उडिद, ऊस आदी पिकांचा पेरा ३० ते ३५ टक्क्यांच्या आसपास आहे.
दरम्यान, दमदार पाऊस आल्याशिवाय पेरणीची कामे हाती घ्यायची नाही, असा निर्धार काही शेतकऱ्यांनी केला असल्याने अद्याप जिल्ह्यातील १३ टक्के क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी झाली नसल्याचे एकंदरित चित्र आहे.
जिल्ह्यात अद्यापपर्यंत सर्वदूर तथा सार्वत्रिक स्वरूपाचा दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यापुर्वी पेरणीची घाई केलेल्या काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीला तोंड द्यावे लागत आहे. हे प्रमाण अत्यल्प असले तरी परिस्थिती लक्षात घेता उर्वरित १३ टक्के शेतकऱ्यांनी दमदार पाऊस होऊन जमिनीत अपेक्षित ओल निर्माण झाल्याशिवाय पेरणी करू नये.
- शंकर तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी, वाशिम