वाशिम जिल्हा तूर्तास ‘कोरोना’मुक्त; सोमवार पासून व्यापार सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 10:52 AM2020-05-03T10:52:37+5:302020-05-03T10:52:53+5:30
जिल्ह्यातील व्यापार पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून राज्यशासनाच्या अधिकृत निर्देशानंतरच यासंबंधीचा निर्णय घेण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीची प्रभावी उपाययोजना म्हणून मार्च महिन्यातील २५ तारखेपासून सुरू असलेला ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपुष्टात येणार आहे. यामुळे ‘कोरोना’मुक्त असलेल्या वाशिम जिल्ह्यातील व्यापार पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून राज्यशासनाच्या अधिकृत निर्देशानंतरच यासंबंधीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी शनिवार, २ मे रोजी दिली.
वाशिम जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि हिंगोली या पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातुलनेत वाशिम जिल्ह्यात एकमेव मेडशी येथे एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळला होता. त्याचाही अंतीम अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने जिल्हा ‘कोरोना’मुक्त होण्यासह ‘ग्रीन झोन’मध्ये समाविष्ट झाला आहे. यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ४ मे पासून जिल्ह्यातील उद्योगधंदे, सलूनची दुकाने, शेतीविषयक सर्व कामे, मद्यविक्रीची दुकाने, आॅटो, टॅक्सी सुरू करण्यास मुभा मिळणार आहे; तर चित्रपटगृहे, हॉटेल्स, शाळा-महाविद्यालये, रेल्वे सद्यातरी बंदच असणार आहे. असे असले तरी यासंबंधी राज्यशासनाकडून अधिकृतरित्या निर्देश मिळत नाहीत, तोपर्यंत ‘लॉकडाऊन’ हटवून व्यापारी पुन्हा सुरू करण्यासंबंधीचा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी शनिवारी स्पष्ट केले. यामुळे व्यापाऱ्यांसोबतच नागरिकही संभ्रमात सापडले आहेत.
खबरदारी घेण्याची गरज
जिल्ह्यात अद्यापपर्यंत केवळ मेडशी येथील एकमेव कोरोनाबाधीत रुग्णाचा अपवाद वगळता अन्य कुठेही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे जिल्हा ‘कोरोना’मुक्त असण्यासह ‘ग्रीन झोन’मध्ये समाविष्ट आहे. असे असले तरी धोका अजून टळला नसल्याने खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून ३ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ लावण्यात आला. तो ४ मे पासून हटवायचा किंवा कसे, यासंबंधी राज्यशासन निर्णय घेणार आहे. शासनाकडून सद्यातरी सूचना नाहीत. अधिकृतरित्या निर्देश मिळाल्यानंतरच वाशिम जिल्ह्यात तशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल.
- हृषीकेश मोडक
जिल्हाधिकारी, वाशिम