बारावीच्या निकालात अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 02:15 PM2018-05-30T14:15:14+5:302018-05-30T14:15:14+5:30
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे.
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे. मागील वर्षीदेखील ९१.३१ टक्के निकालासह वाशिम जिल्हा विभागात प्रथम क्रमांकावर होता.
जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार ८०३ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ७९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९०.४० अशी आहे. उत्तीर्ण १६ हजार ८४ विद्यार्थ्यांमध्ये ९३७० मुले व ६७१४ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८८.५३ तर मुलींची टक्केवारी ९३.१३ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल मंगरूळपीर तालुक्याचा ९१.८७ टक्के लागला आहे. त्याखालोखाल मालेगाव तालुका ९१.६६ टक्के, कारंजा तालुका ९१.०४ टक्के, मानोरा तालुका ९०.६४ टक्के, वाशिम तालुका ८९.८२ टक्के तर रिसोड तालुक्याचा सर्वात कमी अर्थात ८९ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी जिल्ह्यात रिसोड तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला होता.