‘पंचायत विकास इंडेक्स’मध्ये राज्यात वाशिम जिल्हा अव्वल
By संतोष वानखडे | Published: March 20, 2024 08:28 PM2024-03-20T20:28:00+5:302024-03-20T20:28:22+5:30
४९१ ग्रामपंचायतींना ऑनलाईनची जोड : ४८८ ग्रामपंचायतींचा डाटा सादर
वाशिम : ग्रामपंचायतींनी केलेल्या कामांची नोंद ऑनलाईन पद्धतीने ‘पंचायत विकास सूचकांक’ या संकेतस्थळावर सादर करण्यात राज्यात वाशिम जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील ४९१ पैकी ४८८ ग्रामपंचायतींच्या आॅनलाईन कामगिरीमुळे राज्यात वाशिम जिल्हा परिषदेचे नाव उंचावले.
पंचायत विकास निर्देशांक (पीडीआय) हा एक बहु-डोमेन आणि बहु-क्षेत्रीय निर्देशांक आहे. या निर्देशांकाचा उपयोग हा पंचायतींच्या सर्वांगीण विकास, कामगिरी आणि प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. पंचायत विकास निर्देशांक हा ग्राम पंचायतींच्या अधिकारक्षेत्रातील स्थानिक समुदायांच्या कल्याण आणि विकासाची स्थिती मोजण्यासाठी विविध सामाजिक-आर्थिक निर्देशक आणि पॅरामीटर्स विचारात घेतो. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना ऑनलाईनची जोड देण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर झालेली सर्व कामे व उपलब्ध सुविधांचा डाटा ऑनलाईन पद्धतीने ‘पंचायत विकास सूचकांक’ या संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींनी या संकेतस्थळावर डाटा सादर करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडून वारंवार आढावा घेतला. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्यांनीदेखील तत्परता दाखवित ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या कामांचा डाटा संकेतस्थळावर सादर केला. यामुळे पंचायत विकास निर्देशांकात राज्यात वाशिम जिल्ह्याने आघाडी घेतली. जिल्ह्यातील ४९१ पैकी ४८८ ग्रामपंचायतींनी ऑनलाईन डाटा सादर केला असून याची टक्के ९९ अशी आहे. ठाणे, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्याची टक्केवारी तर शून्य आहे. ग्रामपंचायतींनी डाटा सादर करण्यात अमरावती विभागातील बुलढाणा जिल्हा ६ टक्के, अकोला ४ टक्के, यवतमाळ ११ टक्के व अमरावती ४६ अशी टक्केवारी आहे.