वाशिम जिल्ह्यात ६३८६ घरकुलांची कामे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 07:31 PM2021-07-22T19:31:40+5:302021-07-22T19:31:45+5:30
Washim News : पंतप्रधान आवास योजनेतील २ हजार २३४ लाभार्थ्यांना अद्यापही २ रा व ३ रा हप्ता मिळालेला नाही.
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जवळपास ६३८६ घरकुलांची कामे अपूर्ण असून, अनुदानही रखडले आहे. याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत अनुदान तातडीने देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी गुरूवारी केली.
बेघर लाभार्थ्यांना हक्काचे घर देण्यासाठी शासनाकडून रमाई आवास, पंतप्रधान आवास, शबरी आवास आदी योजना राबविण्यात येतात. परंतु अद्यापही जिल्हयातील पात्र व गरजु लाभार्थी घरकुल योजनेपासुन वंचित आहेत. त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे तक्रारी कराव्यात व तक्रारीच्या झेराक्सची प्रत आमच्याकडे सादर करावी, वंचितांना हक्काचे घरकुल देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करु वेळप्रसंगी लढा उभारु, असेही चंद्रकांत ठाकरे म्हणाले. जिल्हयात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ८ हजार ९४६ घरकुले मंजुर आहेत. त्यापैकी ५ हजार ८०१ घरकुल पुर्ण झालेली आहेत. रमाई आवास योजनेंतर्गत ७ हजार १६६ घरकुले मंजुर असुन त्यापैकी ४ हजार ११२ घरकुले पुर्ण झालेली आहेत. तर शबरी आवास योजनेंतर्गत ४८३ घरकुले मंजुर असून २९६ घरकुलेच पुर्ण आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील २ हजार २३४ लाभार्थ्यांना अद्यापही २ रा व ३ रा हप्ता मिळालेला नाही. रमाई योजनेतील २ हजार लाभार्थ्यांना देखील २ रा व ३ रा हप्ता मिळालेला नाही. तसेच शबरी योजनेतर्गत १०६ लाभार्थ्यांना २ रा व ३ रा हप्ता मिळाला नसल्यामुळे एैन पावसाळयाच्या दिवसात त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणीही ठाकरे यांनी केली.