Washim: ठरलं! २८ ला मिळणार 'पीएम'चे दोन हजार, जिल्ह्यातील १.६१ लाख शेतकऱ्यांना मिळेल १६ वा हप्ता
By दिनेश पठाडे | Published: February 23, 2024 03:33 PM2024-02-23T15:33:06+5:302024-02-23T15:33:31+5:30
Washim News:केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.
- दिनेश पठाडे
वाशिम - केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. योजनेचा १६ वा हप्ता कधी मिळेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर केंद्र शासनाने २८ फेब्रुवारीला शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याचे दोन हजार वर्ग केले जाणार असल्याचे निश्चित केले आहे.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे दिले जाते. एका आर्थक वर्षात एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च अशा चार महिन्याच्या कालावधीत हप्ता वर्ग केला जातो. यापूर्वी योजनेचा १५ वा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळाला होता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेपूर्वी १६ वा हप्ता मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. आता तारीख निश्चित करण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. ई-केवायसी व इतर अनुषंगीक प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पात्र असलेल्या १,७०,२०० शेतकऱ्यांपैकी १ लाख ६१ हजार ५११ जणांनी केवायसी पूर्ण केली असून त्यांना हा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर अजूनही ८ हजार ६८९ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली नसल्यामुळे संख्यानिश्चित केल्यानंतर त्यांना लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्य शासनाचा दुसरा हप्ताही लवकरच
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने देखील नमो महासन्मान किसान निधी योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार मिळतील. योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. दुसरा हप्ता देण्यासाठी राज्य स्तरावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा हप्ताही लवकरच मिळणार आहे. तथापि, त्याबाबत अद्याप तारीख निश्चित नसल्याचे सांगण्यात आले आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता मिळेल.