वाशिम जिल्ह्यात शहरांमधील अतिक्रमणाचा प्रश्न झाला गंभीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:15 PM2018-03-21T16:15:28+5:302018-03-21T16:15:28+5:30
वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांमधील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून पार्किंगची ठोस सुविधा नसल्याने व्यावसायिक दुकानांसमोर उभी केली जाणारी दुचाकी वाहने, रस्त्याच्या मधोमध उभे राहून व्यवसाय करणारे भाजी, फळविक्रेत्यांमुळे वाहतूकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे.
वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांमधील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून पार्किंगची ठोस सुविधा नसल्याने व्यावसायिक दुकानांसमोर उभी केली जाणारी दुचाकी वाहने, रस्त्याच्या मधोमध उभे राहून व्यवसाय करणारे भाजी, फळविक्रेत्यांमुळे वाहतूकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे. यामुळे दैनंदिन रहदारी देखील विस्कळित होत असून हा प्रश्न सोडविण्याकामी प्रशासकीय पातळीवरून उदासिनता बाळगली जात आहे.
जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा अशी सहा शहरे आहेत. यापैकी मालेगाव आणि मानोरा या दोन शहरांमध्ये नगर पंचायत; तर उर्वरित चारठिकाणी नगर परिषद कार्यान्वित आहे. दरम्यान, शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी अद्याप एकाही शहरातील स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेतलेला नाही. म्हणायला, अधूनमधून लघुव्यावसायिकांच्या खोक्यांवर जेसीबी चालवून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आल्याचा कांगावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, काही दिवसानंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. यातही गंभीर बाब म्हणजे मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांसमोर पार्किंगची कुठलीच सोय नसताना आणि दुकानांचे शेड, साहित्य मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात दुकानाबाहेर असूनही त्याविरोधात कुठलीच ठोस कारवाई केली जात नसल्याचा सूर समाजातील सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. ही बाब लक्षात घेवून विद्यमान जिल्हाधिकाºयांनी अतिक्रमण हटविण्याची धडक मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.