वाशिम निवडणूक निकाल : लखन मलिक यांची विजयाची ‘हॅटट्रीक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 07:37 PM2019-10-24T19:37:36+5:302019-10-24T19:37:50+5:30
Washim Vidhan Sabha Election Results 2019: लखन मलिक यांनी विजयाची ‘हॅटट्रीक’ करण्यासोबतच तब्बल चौथ्यांदा आमदारकीचा बहुमान प्राप्त केला.
- सुनील काकडे
वाशिम: वाशिम विधानसभा मतदारसंघात यंदा झालेल्या निवडणूकीत शिवसेनेकडून प्रखर विरोध होऊनही भाजपाच्या लखन मलिक यांनी विजयाची ‘हॅटट्रीक’ करण्यासोबतच तब्बल चौथ्यांदा आमदारकीचा बहुमान प्राप्त केला. यापूर्वी तीनवेळा आमदारकीची कारकिर्द गाजविलेल्या तथा चारित्र्यावर भ्रष्टाचार, गैरव्यवहारांचा एकही डाग नसलेल्या स्वच्छ प्रतीमेच्या माणसाला मतदारांचा स्पष्ट कौल मिळाल्याचा सूर राजकीय वर्तुळात उमटत आहे.
जनमानसात सहज मिसळण्याच्या वृत्तीमुळे लोकप्रिय ठरलेल्या आमदार लखन मलिक यांची अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले आहे. लखन मलिक यांनी यापूर्वी १९९०, २००९ आणि २०१४ अशा तीनवेळच्या निवडणूकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करित आमदारकीला गवसणी घातली. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत महायुती होऊनही शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करून शशीकांत पेंढारकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले. ही बाब लखन मलिक यांना फटका देणारी ठरेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र नियोजनबद्ध प्रचार आणि लखन मलिक यांच्या मतदारसंघातील लोकप्रियतेपुढे प्रखर विरोधही सहज मावळून त्यांचा मोठ्या फरकाने विजय सुकर झाला.
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना रिंगणात उतरविण्यात आले होते. राजकारणाचा कुठलाही गंध नसताना तसेच प्रचारासाठी जेमते १५ ते २० दिवस मिळूनही डॉ. देवळे यांनी दुसºया क्रमांकाची मते मिळविली. शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आलेले अपक्ष बंडखोर उमेदवार शशीकांत पेंढारकर हे तिसºया क्रमांकावर राहिले; तर जिल्ह्यात वलय कमी झालेल्या काँग्रेसच्या उमेदवार रजनी राठोड यांनी चौथ्या क्रमांकाची मते मिळविली.
विजयाचा की फॅक्टर
1 स्वच्छ प्रतिमा असलेला माणूस म्हणून लखन मलिक यांची ओळख.
2 पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांचे कार्य व नेतृत्वावर मतदारांचा असलेला विश्वास.
3 शिवसेनेने भाजपाविरूद्ध मतदारसंघात पुकारलेले उघडउघड बंड.