वाशिम : महानगरातून परतलेल्या २७ हजार नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 04:24 PM2020-04-05T16:24:58+5:302020-04-05T16:25:25+5:30
गत १५ दिवसांत सरकारी रुग्णालयांत तपासणी करण्यात आली असून, आजवरच्या तपासणी अहवालावरून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
वाशिम : रोजगारासह विविध कारणांमुळे महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार ५०९ कामगार, मजूर हे कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे ३१ मार्चपर्यंत आपापल्या गावी परतले आहेत. या सर्व नागरिकांची गत १५ दिवसांत सरकारी रुग्णालयांत तपासणी करण्यात आली असून, आजवरच्या तपासणी अहवालावरून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
जिल्ह्यात रोजगाराच्या संधी फारशा उपलब्ध नसल्यामुळे कामगार, मजूर हे गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश आदी परराज्यात तसेच मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी महानगरात रोजगारासाठी जातात. आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. त्याशिवाय जिल्ह्यातील बरीच मंडळीही महानगरात किंवा विदेशात नोकरीसाठी स्थायीक झालेली आहेत. गत तीन महिन्यांपासून जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. देशात दीड महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढला असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून केंद्र सरकारतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. राज्यातही कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता संचारबंदी लागू आहे. परराज्यात तसेच महानगरांत रोजगारानिमित्त गेलेले २७ हजार ५०९ कामगार हे ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात आपापल्या गावी परतले आहेत. या नागरिकांची माहिती आरोग्य विभाग व पोलीस पाटलांनी घेतली असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ एप्रिलपर्यंत करण्यात आली. आजवरच्या तपासणी अहवालावरून या सर्व कामगार व मजुरांची प्रकृती ठणठणीत असून, या सर्वांवर आरोग्य विभागाचा वॉच कायम आहे.
आरोग्य कर्मचाºयांसाठी १८ हजार मास्क उपलब्ध
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकालिन कालावधीत आरोग्य विभाग रुग्णसेवेत व्यस्त असून, आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मास्क, हॅण्डग्लोज व सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. आरोग्य कर्मचाºयांसाठी ट्रिपल लेअरचे १५ हजार मास्क तसेच एन ९५ या प्रकारातील तीन हजार मास्क उपलब्ध केले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सॅनिटायझर व हॅण्डग्लोज उपलब्ध करण्यात आले. आरोग्य कर्मचाºयांसाठी आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध केली जात आहे, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी सांगितले.
महानगरातून परतलेल्या कामगार, मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आजवरच्या अहवालावरून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून, घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, स्वत:बरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद वाशिम
आरोग्य कर्मचारी व अधिकाºयांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर उपलब्ध केले आहे. जनतेने स्वयंशिस्त, लॉक-डाऊन व संचारबंदीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
- चक्रधर गोटे,
सभापती शिक्षण व आरोग्य
जिल्हा परिषद वाशिम