Washim: मतदानाचा हक्क बजावा; ७१५०५ घरांवर लिहिला संदेश, वाशिम जिल्हा परिषदेचा उपक्रम
By संतोष वानखडे | Published: April 24, 2024 01:02 PM2024-04-24T13:02:22+5:302024-04-24T13:10:33+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकशाहीच्या निवडणुकीचा उत्सव अवघ्या एका दिवसावर आला असून, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनदेखील सरसावले आहे. जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या मदतीने तब्बल ७१ हजार ५०५ घरांच्या दरवाजावर मतदानाचा हक्क बजावण्याबाबत संदेश लिहिला आहे.
- संतोष वानखडे
वाशिम - लोकशाहीच्या निवडणुकीचा उत्सव अवघ्या एका दिवसावर आला असून, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनदेखील सरसावले आहे. जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या मदतीने तब्बल ७१ हजार ५०५ घरांच्या दरवाजावर मतदानाचा हक्क बजावण्याबाबत संदेश लिहिला आहे.
जिल्ह्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, लोकशाही मजबूत करण्याकरिता मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या संकल्पनेतून आशा स्वयंसेविकांनी मतदान जनजागृतीचा विडा उचलला आहे. गावातील प्रत्येक घरी जाऊन आशा स्वयंसेविका मतदान करण्यासाठी आवाहन करीत आहेत. या आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन मतदानाबाबत लोकांचे समुपदेशन करीत आहेत तसेच भेट दिलेल्या घरांच्या भिंतीवर अथवा दरवाजावर याबाबत संदेशही लिहीत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७१ हजार ५०५ घरांच्या दरवाजा/भिंतीवर संदेश लिहिण्यात आला. या संदेशामध्ये ‘मतदान हे दान नसून आपल्यावर कोण राज्य करेल हे निवडण्याचा अधिकार आहे, तो अधिकार बजावा’ असा मजकूर लिहिला जात आहे. आशा स्वयंसेविकांच्या या राष्ट्रीय कामाचे कौतुक जि. प. चे सीईओ वैभव वाघमारे यांनी केले.
कोणत्या तालुक्यात किती भींती/दरवाजावर संदेश लिहिला?
तालुका / संख्या
- मंगरूळपीर - १५७४४
- रिसोड- १६३५३
- मालेगाव - ५०२७
- कारंजा - १०८९५
- मानोरा - २०५०
- वाशिम - २१४३६