Washim: ६.८० लाखांची बनावट विदेशी दारू जप्त, दोघांना अटक, ‘राज्य उत्पादन शुल्क’ची कारवाई
By सुनील काकडे | Published: October 27, 2023 09:48 PM2023-10-27T21:48:17+5:302023-10-27T21:54:56+5:30
Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तऱ्हाळा शिवारातील (ता.मंगरूळपीर) हनुमान मंदिरानजिक चारचाकी वाहनातून ६ लाख ८० हजारांची बनावट विदेशी दारू जप्त केली. २५ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे.
- सुनील काकडे
वाशिम : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तऱ्हाळा शिवारातील (ता.मंगरूळपीर) हनुमान मंदिरानजिक चारचाकी वाहनातून ६ लाख ८० हजारांची बनावट विदेशी दारू जप्त केली. २५ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेलूबाजार ते कारंजा रोडवर अवैधरित्या बनावट विदेशी दारुची विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यावरून पथकाने २५ ऑक्टोबर सापळा रचून शिताफिने तऱ्हाळा शिवारातील हनुमान मंदिरानजिक एम.एच. ४३ आर ३३१८ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची झाडाझडती घेतली. त्यात बनावट विदेशी दारू रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिलीच्या २४० सिलबंद बाटल्या, एम्पेरीयल ब्ल्यू व्हिस्कीच्या २४० बाटल्या, ७५० मिली बॉम्बे रॉयल व्हिस्कीच्या ४९ सिलबंद बाटल्या, गोवा राज्यात विक्री होणाऱ्या; पण महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य, बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारी झाकणे व लेबल तसेच १८० मिलीच्या रिकाम्या बाटल्या आदिंसह ६ लाख ८० हजार १६६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी साखरविरा (ता.बार्शीटाकळी, जि.अकोला) येथील नितेश राठोड व सावरसिंग जाधव या दोघांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४० मधील कलम ६५ व भारतीय दंड संहिता कलम ३२८ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गोपीनाथ पाटील यांनी दिली.